काँग्रेसने राज्यात कल्याणकारी योजना आणल्या - माणिकराव ठाकरे Print

ठाणे,
डहाणू नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन एकमेकातले मतभेद विसरून एकजुटीने काम करीत असताना चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर सरळ काँग्रेसच्या कार्यालयाकडे संपर्क साधा. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. डहाणू नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्यासमवेत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वस्त्रोद्योगमंत्री आरीफ नसिम खान, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष दामोदर शिंगडा, अदी इराणी, जगदीश राजपूत, अ‍ॅड. धनंजय मेहेर, विवेक कोरे, पांडुरंग बेलकर आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले की, गृहमंत्री आर. आर. पाटील हे काँग्रेसमध्ये गुन्हेगारी  आहे असे सांगत सुटले आहेत. मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिल्यास गुन्हेगारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे त्यांना दिसून येईल. सर्वसामान्य जनतेला विकासाची फळे चाखता यावीत म्हणून राज्यात अनेक कल्याणकारी योजना आणल्या. सर्वाच्या विकासाबरोबरच सर्वाना बरोबर घेऊन एकत्र बांधून ठेवण्याचे काम काँग्रेस करीत आहे. भाजपबरोबर धर्मनिरपेक्ष पक्ष जाऊ शकत नाही. मात्र त्यांच्याबरोबर जाण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले त्याचा जाब द्यावा लागेल, असे सांगून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डहाणू नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. डहाणूत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून पर्यटन विकास प्राधिकरण निर्माण करून त्याचबरोबर बंदर विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले व चिकू पिकासाठी पीक विमा घेतला जाणार असल्याचे सांगितले.
डहाणू नगरपालिका मोठी संस्था असून, तिच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केली जातात. सर्व जाती, धर्मासाठी पुष्कळ योजना तळागाळातील लोकांसाठी काँग्रेसने आणल्या आहेत. येणाऱ्या वर्षांत १३१ शाळा, कॉलेजेस निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे घडय़ाळ दहा वाजून दहा मिनिटांच्या पुढे जात नाही. त्याचे बारा वाजवा, असे वस्त्रोद्योगमंत्री नसिम खान यांनी केले.
आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी डहाणू नगर परिषदेला साडेतीन कोटींचा निधी दिल्याचे सांगून, विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यांनी एकमेकांतले हेवेदावे विसरून मतदान करण्याचे आवाहन केले.