‘भ्रष्टाचाराचे आरोप करून प्रतिष्ठा मलिन केली जात आहे’ - अजितदादा Print

ठाणे,
सत्तेच्या राजकारणावरचा जनतेचा विश्वास उडाला असून, सकाळ-संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन ऊठसूट कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करूनही आमचीच त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचे कटकारस्थान केले जाते. आम्ही कामे करूनही आमचीच बदनामी केली जाते, अशी संतप्त भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पाटबंधारेमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. डहाणू नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलत होते. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, आमदार जितेंद्र आव्हाड, उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, प्रमोद हिंदुराव, राजेश पारेख आणि हजारो मतदार कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. ज्याच्याकडे सत्ता दय़ाल ती पूर्ण बहुमताने द्या. त्याला कुबडय़ा घेऊन चालण्याची संधी देऊ नका. औटघटकेचे राजकारण फार काळ टिकत नाही. डहाणूत उद्योगबंदी असल्यामुळे साधी पिठाची चक्की काढता येत नाही, हा इथला प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कौडास धरणाचे १७ एमएलडी पाणी मिळण्यासाठी ९० कोटींचा खर्च आहे. येथील भुयारी गटार योजना, प्रत्येकाच्या घरात शौचालय असल्यामुळे पाण्याचा वापर वाढतो. सर्वाना समान वागणूक देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. येथील प्रादेशिक आराखडा तयार झाला असून, क्रीडा संकुल उभारण्याची जरुरी आहे. येथे पर्यटनाला चांगली संधी आहे. त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या घटनेने बदनामी होऊ शकते. चुकलेल्यांना शिक्षा करण्याची ताकद तुमच्या मतात आहे. इलेक्ट्रॉनिक चॅनल रोज नवनवीन आरोप करीत असतात, हे कुठेतरी  थांबले पाहिजे. भाजपचे नितीन गडकरी यांना सार्वजनिक कामासाठी जागा दिली तर चुकले कुठे, असा खोचक सवालही अजितदादा पवार यांनी लगावला. विकासासाठी डहाणू नगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करून डहाणूच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.