विरोधकांनी अध्यक्ष निवडून चालवली रायगड जिल्हा परिषदेची सभा Print

प्रतिनिधी
अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेची आज झालेली सर्वसाधारण सभा ऐतिहासिक ठरली. सत्ताधारी शेकाप-शिवसेना युतीच्या सदस्यांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपला अध्यक्ष निवडून सभेचे कामकाज चालविले. विरोधकांनी आपला अध्यक्ष निवडून सभा चालविण्याची रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. विरोधकांनी आपला अध्यक्ष निवडून सभा चालविल्यामुळे शेकापच्या रास्ता रोको आंदोलनासाठी आजची सभा स्थगित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उधळला गेला.
रायगड जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा होती; परंतु गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातून दूरध्वनी करून व मेसेज पाठवून आजची सभा तहकूब करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. शेकापच्या आंदोलनासाठी आजची सभा तहकूब करण्याचा डाव होता; परंतु विरोधकांनी हा डाव उधळून लावला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे ३१ सदस्य आज सकाळीच अलिबागला आले होते. सकाळी ११ वाजता हे सर्व सदस्य सभागृहात हजर होते. सभा होणार नाही असे समजून अधिकारीदेखील सभागृहात आले नव्हते. ११.३० वाजता अधिकारी सभागृहात आले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अ‍ॅड. राजीव साबळे, राष्ट्रवादीचे प्रतोद महेंद्र दळवी, काँग्रेसचे प्रतोद राजेंद्र पाटील यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा करून सभा तहकूब करण्याची विनंती केली; परंतु ही विनंती विरोधी पक्षांनी फेटाळली. गणसंख्येसाठी २७ सदस्यांची गरज होती. सभागृहात ३१ सदस्य आहेत. गणसंख्या पूर्ण असल्यामुळे सभा वेळेत सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अ‍ॅड. राजीव साबळे यांनी केली. सभागृहात उपस्थित असलेले शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. ते येईपर्यंत सभा घेऊ नका, असे सांगून थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर जिल्हा परिषद कायद्याचे कलम १११(५) अन्वये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असल्यास उपस्थित सभासद ज्येष्ठ सभासदाला अध्यक्ष निवडून सभेचे कामकाज चालवू शकतात, हे अ‍ॅड. साबळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार ज्येष्ठ सदस्य माजी उपाध्यक्ष भाई पाशिलकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्याची सूचना शामाकांत भाकरे यांनी केली. त्यास काँग्रेसचे प्रतोद राजेंद्र पाटील यांनी अनुमोदन दिले. शामाकांत भोकरे, राजेंद्र पाटील, महेंद्र दळवी यांनी भाईंना अध्यक्षांच्या खुर्चीवर नेऊन बसविले.
बांधकाम सभापती संजय जांभळे व शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भाई पाशीलकर अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांनी रीतसर सभा सुरू करून सभेचे कामकाज चालविले. या सभेत बसण्याचे धाडस बांधकाम सभापती संजय जांभळे व शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार दाखवू शकले नाही. सभा सुरू होताच हे दोघेही सभागृहातून निघून गेले. सभागृहात बसण्याचे धाडसही हे दोघे दाखवू शकले नाहीत. याउलट अरविंद म्हात्रे व राम करावकर हे दोघे उशिरा सभागृहात आले. त्यांनी कामकाजात सहभाग घेतला. अरविंद म्हात्रे यांनी वीज मंडळांनी शाळांनी घरगुती मीटर बसविण्याची मागणी केली. मागील सर्वसाधारण सभेत तेराव्या वित्त आयोगाची रक्कम समप्रमाणात वाटण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु तसे न होता केवळ चार तालुक्यांमध्येच निधीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे मागील सभेच्या इतिवृत्तातील काम क्र. १४ ठराव क्र. ७६ नामंजूर करण्याची मागणी शामाकांत भाकरे यांनी केली. तसा ठराव मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्ष निधी वाटपात पक्षपात करतो. १५ तालुके असताना केवळ ४ तालुक्यांमध्येच निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला खीळ बसत आहे. असमतोल विकास होत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रतोद राजेंद्र पाटील यांनी केली. सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब करण्याचा सपाटाच लावला आहे. सर्वसाधारण सभा हे सदस्यांना आपले प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ असते. असे असताना प्रत्येक सभा तहकूब करण्यात येते. सभा होत नसल्यामुळे कामांचा आढावा घेता येत नाही. झेड.पी. म्हणजे झीरो प्रमाण अशी परिस्थिती असल्याची टीका अ‍ॅड. राजीव साबळे यांनी केली. विरोधकांना विचारात न घेता केवळ सत्ताधारी पक्षांच्याच लोकांची कामे केली जातात, अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली.