रायगड जिल्ह्य़ातील इकोसेन्सेटिव्ह झोनला काँग्रेसचा विरोध Print

प्रतिनिधी
अलिबाग
 पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य परिसरात येऊ घातलेल्या इकोसेन्सेटिव्ह झोनला विरोध करण्याचा निर्णय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला आहे. या परिसराला इकोसेन्सेटिव्ह झोन घोषित केल्यास त्याचे पनवेल आणि उरण तालुक्यांतील विकासकामांवर विपरीत परिणाम होणार आहेत. त्यामुळे कर्नाळा परिसराचा ईएसझेडमध्ये घोषित केला, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तसे निवेदन त्यांनी पालकमंत्री सुनील तटकरे यांना दिले आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळामार्फत देशातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांच्या सभोवतालचा परिसर इकोसेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केला जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यालगतचा १० किलोमीटरचा परिसर इकोसेन्सेटिव्ह म्हणून घोषित केला जाणार आहे. यामुळे या परिसरात दगडमाती उत्खननापासून ते निरनिराळ्या विकासकामांवर र्निबध येणार आहे.
कर्नाळा अभयारण्याच्या १० चौरस किलोमीटर परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच एसईझेड प्रकल्प येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता आहे. तसेच पनवेल परिसरात असणाऱ्या दगडखाणी आणि क्रशर्स व्यवसायावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायावर याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने विरोध करायचा निर्णय घेतला आहे.  नवी दिल्लीतील आणि गुडगावजवळील सुलतानपूर पक्षी अभयारण्यात ही हद्द पाच किलोमीटपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. स्थानिक लोकांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारनेही या इकोसेन्सेटिव्ह झोनला विरोध करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्री सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.