‘पेपर फुटीसह गैरप्रकारांचे मळभ आता तरी दूर व्हावे’ Print

परीक्षा पद्धतीत सुधारणेवर आज मुंबईत बैठक
प्रदीप राजगुरू
औरंगाबाद
‘ही परीक्षा व्यवस्थेत सुधारणा की व्यवस्था सुधारणेची सत्त्वपरीक्षा’ असा काहीसा संभ्रमाचा सूर महाविद्यालयांच्या पातळीवर उमटत आहे. निमित्त आहे उद्या (शनिवारी) राज्यपाल तथा कुलपतींच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ स्तरावरील परीक्षा पद्धतीच्या बहुचर्चित सुधारणेबाबत होऊ घातलेल्या बैठकीचे! महाविद्यालयात होणाऱ्या पदवी परीक्षांचे एकूणच विस्कळीत झालेले स्वरूप, पेपर फुटीचे वाढते प्रकार, व्यवस्थेतील दोषांकडे दुर्लक्ष वा पांघरूण घालण्याचा प्रयत्न यामुळेच ही साधार भीती शिक्षण क्षेत्रातील धुरीण बोलून दाखवत आहेत. शिक्षण व्यवस्थेला मारक ठरणाऱ्या परीक्षा पद्धतीतील ही कीड वेळीच काढून त्यावर ठोस उपाय दिल्यास भावी पिढीला ते निश्चितच पूरक ठरेल, असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. मुंबईच्या राजभवनात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.
परीक्षा पद्धतीतील गुणदोषांवर या बैठकीत सांगोपांग चर्चा होणार असली, तरी पेपर फुटीसह इतरही काही दुर्लक्षित, परंतु महत्त्वाच्या बाबींकडे या निमित्ताने लक्ष वेधले जाते. सन १९९४च्या विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयातील परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून प्राचार्य पदसिद्ध कार्यभार पाहतात. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातील परीक्षांच्या गुणावगुणांची जबाबदारी त्यांच्यावरच असते. परंतु काही मोजकेच अपवाद वगळता बहुतेक महाविद्यालयांत प्राचार्य त्यांच्या विश्वासू प्राध्यापकाकडे हे काम सोपवतात. तसेच बहुतेक महाविद्यालयांत प्राचार्याची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केंद्र संचालकपद दुसरेच कोणीतरी सांभाळते. या पाश्र्वभूमीवर प्रामुख्याने गेली २-३ वर्षे या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्र संचालकांचा कारभार संशोधनाचाच विषय झाला आहे! दीर्घ रजेवर गेल्यासच प्राचार्य आपला कार्यभार प्रभारी किंवा उपप्राचार्य यांच्याकडे देऊ शकतात, अन्यथा नाही. परंतु रजेवर नसतानाही बहुतेक वेळा प्राचार्य परीक्षा केंद्र संचालक म्हणून पुरेशा गांभीर्याने जबाबदारी पार पाडत नाहीत, या कडे या प्राध्यापकांनी लक्ष वेधले.
भरारी पथकांची बरखास्ती!
दरम्यान, ‘नेटच्या युगातही परीक्षेचा गोंधळ’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ने (१ नोव्हेंबर) ठळक वृत्त प्रसिद्ध करताच अनेक प्राध्यापकांनी वरील काही बाबींवर उजेड टाकत परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदलांची निकड प्रकर्षांने बोलून दाखविली. औरंगाबाद जिल्ह्य़ातील देवगाव रंगारी (तालुका कन्नड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठाने (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) एक दिवस पुढे ढकललेली बी. एस्सी.ची तिसऱ्या वर्षांची गणित विषयाची परीक्षा पूर्वघोषित वेळापत्रकाप्रमाणे आदल्या दिवशीच घेतली, यावर या वृत्तात ठळक प्रकाश टाकला होता. या महाविद्यालयात गेलेल्या भरारी पथकाच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आला. पथकाने विद्यापीठास याबाबत अहवाल पाठविला. परीक्षा पद्धतीतील अशा ढिसाळपणामुळेच विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या कडे लक्ष वेधले.
दरम्यान, आदल्या दिवशीच परीक्षा घेण्याच्या प्रकाराकडे भरारी पथकाने अहवालाद्वारे विद्यापीठाचे लक्ष वेधले; परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार घडल्यावर एक-दोन दिवसांतच या महाविद्यालयात गेलेल्या पथकासह इतर सर्वच भरारी पथके बरखास्त करण्यात आली! नियुक्तीनंतर मुदत संपायला अवकाश असतानाच ही पथके बरखास्त केल्याचे सांगण्यात येते.     

परीक्षा सुधारणेसाठी याचा विचार व्हावाच!
*  सन १९९४च्या विद्यापीठ कायद्यानुसार स्वत: प्राचार्यानीच महाविद्यालयात परीक्षा केंद्र संचालक म्हणून काम पाहणे अभिप्रेत आहे.
*  बहुतेक महाविद्यालयांत जूनमध्ये मान्यता घेतली गेल्यावर प्राचार्य पदभार सोडून जातात. तसेच अनेक मान्यताप्राप्त प्राध्यापकही या महाविद्यालयात नाहीत. ही अनिश्चितता दूर व्हावी.
*  ऑनलाइन परीक्षेत ‘सविस्तर उत्तरे लिहा’ या बाबत असणारा संभ्रम. संक्षिप्त ‘होय-नाही’ उत्तरे देण्यात अडचण नाही. परंतु अन्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी कशी द्यावीत? त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ, टायपिंगचा वेग वगैरे बाबी विचारात घेणार काय?
*  परीक्षेचे गांभीर्य राहण्यास दक्षता पथके असलीच पाहिजेत. परंतु दहावी-बारावीच्या धर्तीवर पथकाला परीक्षेचे चित्रीकरण करू देणे योग्य ठरेल. त्याशिवाय परीक्षेतील गैरप्रकाराबाबत वरिष्ठांना पाठविल्या जाणाऱ्या अहवालास दुसरा आधार तो कोणता?
*  २-३ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना वर्णमालेप्रमाणे दुसऱ्या महाविद्यालयातही जाऊन परीक्षा द्यावी लागत असे. परंतु आता पुन्हा ‘होम सेंटर’ दिले जात असल्याने विद्यार्थी आपापल्या महाविद्यालयातच परीक्षा देतात. मोठे गाव वा शहरांत जास्त महाविद्यालये असल्याने परीक्षेचे गांभीर्य व शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी वर्णमालेप्रमाणेच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य ठरेल.