संस्थान कर्मचाऱ्यांना ४ कोटी ८४ लाख ‘दिवाळी भेट’ Print

औरंगाबाद खंडपीठाचा आदेश
राष्ट्रपतींच्या शिर्डी भेटीस ७७ लाखांचा खर्च मंजूर
प्रतिनिधी
औरंगाबाद
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून ४ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी मान्यता दिली. तसेच राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी मागणी करण्यात आल्याप्रमाणे ७७ लाख खर्चही मंजूर करण्यात आला. संस्थानचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या समितीने या प्रकारच्या खर्चास मान्यता मागितली होती. न्या. नरेश पाटील व न्या. ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठाने मान्यतेबाबतचे आदेश निर्गमित केले.
येत्या १६ नोव्हेंबरला साईबाबांच्या दर्शनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार असल्याने हेलिपॅड उभारणे व इतर खर्चासाठी ७७ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे निवेदन खंडपीठाकडे करण्यात आले होते. ही विनंती मंजूर करण्यात आली. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या खर्चाची तरतूद सरकारमार्फत करावी की संस्थानमार्फत, याविषयीच्या नियमांची माहिती सरकारी वकिलांनी २१ नोव्हेंबरला पुढील सुनावणीच्या वेळी द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सन १९७७पासून साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी काही रक्कम भेट म्हणून दिली जाते. साधारणत: एक महिन्याचा पगार असे त्याचे स्वरूप असते. यासाठी ४ कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्याच्या निवेदनास याचिकाकर्त्यांच्या वकिलाने आक्षेप नोंदविले नाही. त्यामुळे ही रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले. साईबाबा संस्थानमधील मौल्यवान दागदागिने व संपत्ती याच्या सुरक्षिततेबाबतची काळजी अत्याधुनिक तंत्राने घेतली जावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.