‘अनाम प्रेम’ तर्फे तृतीयपंथीयांसाठी १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान आनंदमेळा Print

प्रतिनिधी
पुणे
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘अनाम प्रेम’ या सामाजिक संस्थेमार्फत त्यांच्यासह आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ नोव्हेंबर या काळात गोवा येथे होणाऱ्या या आनंदमेळाव्यात संपूर्ण राज्यातून तृतीयपंथी सहभागी होणार आहेत.
पुरुष किंवा स्त्री अशा लिंगभेदापासून दूर असणाऱ्या या व्यक्तींना ‘व्यक्ती’ म्हणून ओळख नाही. समाजाने त्यांचा स्वीकार करावा, माणूस म्हणून त्यांच्याकडे बघावे या उद्देशाने ‘अनाम प्रेम’ मार्फत विविध प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांमध्ये ‘अनाम प्रेमी’ तृतीयपंथीयांना आदरपूर्वक आपल्या घरी प्रीतिभोजन देतात. त्यांच्या वाडय़ावस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. दरवर्षी महावीर जयंतीच्या दिवशी राज्यातील तृतीयपंथीयांचे एकत्रीकरण करून आनंदोत्सवाचे मागील दोन वर्षांपासून मुंबई येथे आयोजन करण्यात येत आहे. याचाच पुढचा टप्पा आणून तृतीयपंथीयांना समाजाने समजावून घ्यावे या उद्देशाने आयोजित या संमेलनाच्या यशस्वीततेसाठी सी.एम.सावंत, कृपाली बिडवे, सतीश सोनक आदी मंडळी प्रयत्न करीत आहेत. आझाद भवन, परवरिम, पणजी, गोवा येथील सभागृहात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत ‘आमचा काय दोष?’ या शीर्षकांतर्गत एक कार्यक्रम होणार आहे. तसेच तृतीयपंथीयांसाठी गोवा परिसरातील निसर्गसहलदेखील या निमित्ताने याचकाळात आयोजित करण्यात आली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या उत्पनाची योग्य साधने कशी उपलब्ध होतील, यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या भावना आणि समस्या समजून घेता याव्यात, याबरोबरच कोणत्याही अपेक्षेविना त्यांच्याशी मैत्री करण्यास इच्छुक असणाऱ्या मंडळी या आनंदमेळाव्यात सहभागी होऊ शकतील. तृतीयपंथीदेखील माणूसच आहेत, हे समजून घेऊन त्यांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्याबद्दलची भीती, घृणा दूर व्हावी असादेखील या आनंदमेळ्याचा उद्देश आहे.