ऊसाच्या दरावरून संघटनांमध्येच वाद Print

शेतकरी संघटनांमधील विसंगतीने शेतकरी संभ्रमात
दयानंद लिपारे
कोल्हापूर
ऊस दर व शेतक ऱ्यांच्या भावना यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक वाद जुंपला आहे, तर आता या वादाला नवी फोडणी मिळाली असून शेतक ऱ्यांच्या नेत्यांनी परस्परांवर शरसंधान करण्यास सुरुवात केली आहे. खासदार राजू शेट्टी, शरद जोशी, रघुनाथदादा पाटील या तीन वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपाची राळ उठविण्यास सुरुवात केली आहे. उसाचा दर यामागील अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान या मुद्याला धरून या तिन्ही नेत्यांनी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केल्याने सामान्य शेतकरी संभ्रमात पडला आहे. या तिन्ही नेत्यांसह शिवसेना आणि डावी आघाडी यांनी दराच्या वादात उडी घेतल्याने शेतकरी संघटनांतील वाद भडकत चालल्याचे दिसत आहे. परस्परांवर बोचरी टीका केली जात असल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह लागत चालले आहे.
ऊस गळीत हंगाम जवळ आला की राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची सुगी सुरू होते. शेतकऱ्यांचे आपणच खरे कर्तेधरते आहोत हे दर्शविण्यासाठी उसाला पहिली उचल अधिकाधिक मिळण्यासाठी उच्चारवात आवाज दिला जातो. इतर संघटनांनी मागितलेल्या उचलीच्या रकमेपेक्षा आपली रक्कम अधिक असावी याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवले जाते. याचा प्रत्यय यंदाच्या हंगामातही आला आहे.
तीन डावे पक्ष व जनता दल यांनी एकत्रित येऊन शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आहे. कोल्हापुरात या संघटनेचा राज्यव्यापी मेळावा होऊन त्यामध्ये पहिली उचल २ हजार ८८० रुपये मिळावी अशी मागणी झाली. पाठोपाठ शिवसेनेने ३ हजार रुपये उचल मिळावी या मागणीवरून रास्तारोको आंदोलन सुरू केले. पाठोपाठ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या तीन संघटनांच्या ऊस परिषदा पश्चिम महाराष्ट्रात धडाक्यात झाल्या. या भागात शेतकऱ्यांची बलाढय़ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३ हजार रुपये यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन लगोलग आंदोलनाला हातही घातला. त्यानंतर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेची परिषद होऊन त्यामध्ये दोन प्रकारचे दर मागण्यात आले.
पुणे व अहमदनगरसाठी २ हजार ९०० रुपये तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ३ हजार १०० रुपये मिळावेत, असा घोषा लावला गेला. तर या सर्व संघटना जाग्या होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी इतर संघटनांच्या दराचा आवाजही पोहचणार नाही, अशी ४ हजार ५०० रुपये दराची हनुमान उडीच मारली होती.
 बऱ्याचशा कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला असला तरी स्वाभिमानीसह अन्य संघटनांनी आंदोलन चालू केल्यामुळे उसाचे गाळप थांबले आहे, तर दुसरीकडे याचवेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये ऊस दरावरून वाद धुमसू लागला आहे. राजू शेट्टी व शरद जोशी यांनी उसाला पहिली उचल ३०००-३१०० मागून शेतकऱ्यांचा द्रोह केला आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. उसाचा उत्पादनखर्च मुळातच प्रतिटन ३ हजार रुपये असताना स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार पहिली उचल किमान ४ हजार ५०० रुपये मिळणे रास्तच आहे, असे त्यांचे अर्थशास्त्र आहे. जोशी-शेट्टी यांच्या भूमिकेमुळे साखर स्वस्त होणार असून त्यामुळे उद्योजकांचाच फायदा होणार आहे. त्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. कमी दर मागून शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करताना पाटील यांनी कमी दर मागितल्याने शरद जोशी यांची बुध्दी चालत नाही का असा टिकात्मक सवाल उपस्थित केला आहे.
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी खासदार शेट्टी यांना टीकेचे लक्ष केले आहे. खासदार शेट्टी हे काँग्रेसचे बगलबच्चे असल्याचा आरोप देवांग यांनी केला होता. मात्र देवांग यांना जमेत न धरता खासदार शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये शरद जोशी यांच्यावरच टिकास्त्र सोडले. शरद जोशी यांची एकही चळवळ यशस्वी ठरली नसल्याचे टीका करून शेट्टी यांनी आपल्या मागे हजारो शेतकरी उभे राहतात ते केवळ माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे, अशी टिपणी केली आहे. ३ हजार रुपयांची पहिली उचल मागताना ऊस उत्पादनाचे तत्त्वज्ञान व व्यवहार याची सांगड घातली असल्याचे सांगत जनाधार गमाविलेल्या जोशींच्या बोलण्याला किंमत देत नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे या घडामोडी पाहता शेतकऱ्यांचे नेते खालच्या पातळीवर येऊन परस्परांनाच कात्रजचा घाट दाखवत चालल्याने सामान्य शेतकरी मात्र गोंधळात पडलेला आहे. खरेतर शेतकरी संघर्ष समितीने उसाच्या उचलीला तोंड फोडताना उसाच्याअर्थशास्त्राचा विचार करावा, असे ठासून सांगितले होते. तथापि आता मात्र शेतकऱ्यांच्या सर्व पाच-सहा संघटना आपलीच दिशा योग्य असल्याचा टेंबा मिरवित रस्त्यावर उतरल्याने ऊसदराची दिशा भरकटत जाताना दिसत आहे.