रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही डेंग्यूचे ५ संशयित; एकाला लागण Print

खास प्रतिनिधी
रत्नागिरी
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातही आता डेंग्यूचे संशयित पाच रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी एकाला या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात साथीच्या अन्य रोगांचे प्रमाण नियंत्रणात असले तरी बहुचर्चित डेंग्यू रोगाचे रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सचिंत झाली आहे. गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेने या रोगाचा एकही रुग्ण नसल्याचा अहवाल दिला होता. त्याच वेळी चिपळूण तालुक्यातील वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांनी डेंग्यूचे आठ ते दहा रुग्ण दाखल असल्याचे सांगून जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, आता येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातही डेंग्यूचे संशयित रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. येथे उपचार घेत असलेल्या पाच जणांपैकी एकाला लागण झाल्याचे प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालावरुन निष्पन्न झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाचाही मृत्यू ओढवलेला नाही.
दरम्यान, या रुग्णालयात गेल्या जानेवारीपासून आजअखेर विविध प्रकारच्या तापाच्या संसर्गामुळे एकूण ६३ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यापैकी २७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने कोणाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे यांनी दिली.