कणकवलीत मोटरसायकलचा अपघात; तीन जण ठार Print

वार्ताहर
सावंतवाडी
एस.टी. बस चुकल्याने मोटरसायकलने कणकवलीत परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या चुलत बहिणीसह तिघा भावंडांचा अपघातात मृत्यू झाला. एस.टी. बसच्या पाठलागात ओव्हरटेकमुळे हा भीषण अपघात घडला. कणकवली तालुक्यातील फणसगाव येथून कणकवलीत जाणाऱ्या या भावंडांचा मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे येथे हा अपघात घडला. यावेळी अपघातस्थळी ठार झालेल्या भूषण नारकर याच्याकडे दीड लाख रुपयांची रोकड मिळाली.
या अपघातात भूषण देवेंद्र नारकर (२३), गौरव देवेंद्र नारकर (२१) व प्रज्ञा प्रदीप नारकर हे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाले. मोटरसायकल एस.टी. बसला ओव्हेरटेक करताना समोर व्होल्वो बस आल्याने हा भीषण अपघात घडला.
कणकवली-फणसगाव येथील प्रज्ञा प्रदीप नारकर ही बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण करून  संगणकाच्या क्लासमध्ये जात होती. ती परीक्षेस जाण्यासाठी आली असताना बस चुकल्याने चुलत भावासोबत कणकवलीत जात होती.
एस.टी. बसचा पाठलाग करतानाच ओव्हरटेकच्या नादात मोटरसायकलला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.