खंडणी व खून प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी Print

प्रतिनिधी
नाशिक
सातपूर येथील कंपनीतील कामगाराचा ५० हजारांच्या खंडणीसाठी खून केल्याप्रकरणी संबंधिताच्या दोन मित्रांची शुक्रवारी न्यायालयाने १० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. संबंधिताच्या वडिलांकडे संशयितांनी पाच कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणी आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
राजस्थानमधील संजीवकुमार ऊर्फ सनी नरेशकुमार अग्रवाल (२६) काही वर्षांपासून नाशिकच्या एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत कार्यरत असलेल्या सचिन मानेशी त्याची ओळख झाली. या मैत्रीतून माने व त्याचा दुसरा मित्र भंगार बाजारातील राजकुमारसिंग (मूळ आझमगड, उत्तर प्रदेश) याच्याकडे येत-जात होते. सनीने कुटुंबीयांकडून व्यवसायासाठी २० ते ३० लाखांची रक्कम येणार असल्याचे सांगितले होते. मानेने पाळत ठेवून सनीच्या घरात पैसे असल्याचे लक्षात येताच राजकुमारसिंगला बोलावून दोघांनी मिळून सनीला बेदम मारहाण केली. या वेळी धारदार शस्त्राने वार करून त्याची १३ ऑगस्टला हत्या करण्यात आली. संशयित माने व त्याच्या आणखी काही साथीदारांनी सनीचा मृतदेह घरातीलच टीव्हीच्या खोक्यात घालून इगतपुरी-कसारा मार्गावर पुलावरून फेकून दिला. त्यानंतर संशयितांनी सनीच्या कुटुंबीयांना भ्रमणध्वनीद्वारे तो जिवंत पाहिजे असल्यास पाच कोटींची खंडणी देण्याची मागणी केली होती. अखेर ही रक्कम दोन कोटींवर निश्चित झाल्याचे त्याचे वडील नरेशकुमार अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले. सनीचा शोध लागत नसल्याने त्यांनी नाशिकला दाखल होऊन गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी माने व राजकुमारसिंग यांना अटक केली आहे. या दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना १० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयितांचा अन्य एक साथीदार हाफीज शकील अन्सारी याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी दिली.