मागील आर्थिक वर्षांत नाशिक दूरसंचारला सर्वाधिक तोटा Print

प्रतिनिधी
नाशिक
मागील आर्थिक वर्षांत नाशिक दूरसंचारला आतापर्यंतचा सर्वाधिक तोटा झाला असून २०११-१२ चे उत्पन्न १२२ कोटी तर खर्च १५६.२७ कोटी असल्याचे दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत नाशिक दूरसंचारचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.
खा. समीर भुजबळ यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. बीएसएनएलएलला २०११-१२ मध्ये ३४.२७ कोटी, २०१०-११ मध्ये ३३.३३ कोटी,  २००९-१० मध्ये ३३.१७ कोटी तर सन २००८-०९ मध्ये ६.४१ कोटीचा तोटा झाला आहे. २००७-०८ मध्ये नाशिक बीएसएनएलला २१.१३ कोटीचा नफा झाला होता. त्यावेळी उत्पन्न १७६.७६ कोटी तर खर्च १५५.६३ कोटी होता, असेही मल्होत्रा यांनी सांगितले. नाशिक शहरात जयभवानी रोड, वडाळा-पाथर्डी रोड, आडगाव ट्रक टर्मिनस येथे नवीन दूरध्वनी केंद्र प्रस्तावित आहे. तर नव्याने विकसित झालेल्या सद्गुरूनगर, काठे गल्ली, चैतन्यनगर, गायकवाड मळा, आवटे मळा, हरीअंगण, अश्विन कॉलनी, गाडेकर मळा, मयूर कॉलनी येथे भूमिगत केबल टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्य़ात सिन्नर, वडांगळी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, येवला, नांदगाव, पेठ येथे मोबाईल रेंजची समस्या असल्याचे बीएसएनएलने मान्य केले असून त्यामुळे फोन खंडित होणे, व्यस्त लागणे, क्रॉस कनेक्शन लागणे, इत्यादी तक्रारी येत आहेत. नव्याने १०१ टॉवर उभारण्यात येणार असून त्यानंतर ही समस्या राहणार नाही, असे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.