शेकापच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प Print

*  प्रवाशांचे अतोनात हाल   
*  पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत
प्रतिनिधी
अलिबाग
 मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आज तब्बल तीन तास ठप्प पडली होती. रायगड जिल्ह्य़ातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने वडखळ इथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे ही वाहतूक बंद होती. रस्त्यांची दुरुस्ती काम तातडीने सुरू झाली नाही तर जिल्हय़ात एकाही मंत्र्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला.
  मुंबई-गोवा महामार्ग तसेच जिल्ह्य़ातील सर्व राज्य मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यावर वाहने चालवणेही आता कठीण झाले आहे. मात्र तरीही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे खराब रस्त्याच्या प्रश्नावर आता जिल्ह्य़ातील शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाने आज वडखळ नाका इथे  रास्ता रोको करून मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक तब्बल तीन तास रोखून धरली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले हे आंदोलन साडेबारा वाजेपर्यंत सुरू होते. शेकापच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांची पुढे सरसावण्याची हिंमत झाली नाही. तीन तास रोखूनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणेच पसंत केले. तर रास्ता रोकोमुळे महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.
जिल्ह्य़ातील रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्ते गाडी चालवण्याच्या लायकीचे राहिले नसल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे आजकाल हेलिकॉप्टरने फिरत असल्याने त्यांना रस्त्यांची दुर्दशा लक्षात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस राष्ट्रवादी भाऊ भाऊ आणि दोघे मिळून खाऊ, अशी राज्य सरकारची परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून निधी येऊनही अद्याप भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सात दिवसांत जिल्ह्य़ातील रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्य़ात फिरकू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या तीस वर्षांत जिल्ह्य़ात आरसीएफ, सिडको, जेएनपीटी, एचओसी, आरपीसीएस यांसारख्या मोठमोठय़ा कंपन्या आल्या. जिल्ह्य़ात उद्योगांच्या अनुषंगाने तब्बल ८५ हजार कोटींची गुंतवणूक झाली, मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी निर्णय राज्य सरकारने घेतला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तर आमदार विवेक पाटील यांनी जिल्ह्य़ात उद्योगामुळे अवजड वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असल्याचे सांगितले. वाहनांची संख्या वाढली असली तरी जिल्ह्य़ातील रस्ते मात्र सुधारले नाहीत. हजारो टन अवजड मालवाहतूक जिल्ह्य़ात केली जाते, त्यामुळे येणाऱ्या काळात रस्त्यांची कामे करताना त्यांचे निकष बदलले पाहिजेत आणि आवश्यक ठिकाणी चौपदरीकरण केले गेले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार मीनाक्षी पाटील, माजी आमदार मोहन पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पाटील, आस्वाद पाटील, प्रशांत नाईक आणि नृपाल पाटील उपस्थित होते.