धुळ्याला पाणी देण्यास साक्रीकरांचा विरोध Print

* साक्रीत ‘रास्ता रोको’  
* पाणीयुद्ध पेटण्याची चिन्हे
वार्ताहर
धुळे
पंधरा वर्षांपासून मानवतेच्या दृष्टिकोनातून पिण्याचे पाणी पुरविले. परंतु यापुढे साक्रीच्या प्रकल्पातून धुळ्यास पाणी दिले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत शुक्रवारी साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समितीने ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे यापुढे धुळे शहर विरुद्ध साक्री असे पाणीयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, उपजिल्हाधिकारी हिरालाल सोनवणे यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. या आंदोलनाचे पडसाद शनिवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.
धुळे शहराला सर्वाधिक पाणी पुरविणारा नकाणे तलाव कोरडा पडल्याने आणि दुसरीकडून पाणी मिळण्याची शक्यता नसल्याने पुढील दोन महिन्यांत शहरास भीषण टंचाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तापी आणि आरक्षित असलेल्या अक्कलपाडा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन असले तरी भविष्यात साक्री तालुक्यातील लाटीपाडा, मालनगाव आणि जामखेडी या धरणातूनही पाणी आणावे लागणार आहे. महापालिकेचे असे नियोजन दरवर्षी असते. त्या मोबदल्यात सिंचन विभागाला पैसे दिले जातात. त्यास साक्री तालुक्यातून यापूर्वी कधीही विरोध झाला नाही. यंदा मात्र साक्री तालुक्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे अनेक गावांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेकडून धुळे शहरासाठी पाणी आरक्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याने तालुक्यातील जनतेने पालिकेला तापी पाणीपुरवठा योजना आणि अक्कलपाडा योजनेचा पर्याय सुचविला आहे. परंतु साक्रीकरांना सुचविलेला पर्याय खर्चिक आणि तांत्रिकदृष्टय़ाही परवडणारा नसल्याने पालिका आणि लोकप्रतिनिधी साक्रीतूनच पाणी आणण्यावर ठाम आहे.
या पाश्र्वभूमीवर, साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली असून शुक्रवारी रास्ता रोको करीत तालुक्यातून पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविला. या आंदोलनात भाजप, शिवसेना, माकप, छावा संघटना, कारखाना कामगार यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या. आ. योगेश भोये, माजी खासदार बापू चौरे, शिवाजी दहिते, सुभाष काकुस्ते, नरेंद्र मराठे, पी. आर. शेवाळे, जितेंद्र मराठे, राजेंद्र भामरे, पोपट सोनवणे, या नेत्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, धुळेकरांसाठी साक्री तालुक्यातून पाणी मिळणार नाही. पालिकेने तसे नियोजन करावे, पाणी मागण्याचे तंत्र दरवेळी वापरू नये, असा इशारा आ. अमरीश पटेल यांनी दिल्यानंतर धुळ्याचे आ. अनिल गोटे यांनी पाणी ही कुणा एकटय़ाची जहागिरी नाही, असे प्रत्युत्तर दिले. १७ नोव्हेंबर रोजी या विषयावर जाहीर सभा घेण्याचा निर्णयही गोटे यांनी घेतला.