‘नीलम’मुळे थंडीला हुडहुडी..! Print

आगमन होणार आठवडाभराने
विशेष प्रतिनिधी
पुणे
राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच नीलम चक्रीवादळ आडवे आल्याने थंडीच्या प्रवासात मोठा व्यत्यय आला आहे. त्यामुळे आता गुलाबी थंडीसाठी आणखी आठवडय़ाची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. इतकेच नाही तर आता दिवाळी तोंडावर आलेली असताना विदर्भात अनेक ठिकाणी, तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी पाऊसही पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिवाळीच्या सणाला मात्र थंडी अनुभवायला मिळेल, असे आताचे चित्र आहे.
राज्यात या वेळी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस कायम राहिला. त्यानंतर अगदी दसऱ्यालासुद्धा पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होऊ लागली आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली उतरले. पुण्यात किमान तापमान १२.७ अंश, तर नाशिकमध्ये ते ११.२ अंशांपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे राज्यात थंडी व्यापणार असेच वातावरण होते. मात्र, त्याच वेळी बंगालच्या उपसागरात नीलम चक्रीवादळ निर्माण झाले आणि ते आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकले. त्याचा परिणाम म्हणून हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले आणि थंडी दूर पळाली. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी पाऊसही झाला. परिणामी आता एक-दोन ठिकाणे वगळता राज्याच्या सर्वच भागातील तापमान सरासरीच्या वर गेले आहे. हीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले, ‘नीलम वादळाची तीव्रता कमी झाली आहे, तरीही हे वादळ आंध्र प्रदेश, ओरिसाच्या जवळ आल्याने सरकले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी राज्यात ढगाळ वातावरण असेल. विशेषत: विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, राज्याच्या इतर भागातही मोजक्या ठिकाणी पाऊस पडेल. आता पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास आणखी पाच-सहा दिवस तरी लागतील.’
दरम्यान, नीलम वादळाच्या पाठोपाठ लगेच तरी थंडी घालविणारी हवामानाची स्थिती अपेक्षित नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत ढगांचे मळभ पूर्णपणे दूर होईल आणि दिवाळीचा सण थंडीमध्ये साजरा करता येईल, अशी शक्यता आहे.