मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने अमरीश पटेल यांना बळ Print

संतोष मासोळे
धुळे, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

डबघाईला गेलेली जिल्हा बँक, शिरपूर साखर कारखाना आणि अन्य लहान-मोठय़ा कारणांनी काँग्रेसविरोधात वाढलेले जनमत थोपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा आ. अमरीश पटेल यांच्या राजकीय अस्तित्वासाठीचा मोठा आधार ठरल्याचे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या मेळाव्यास केवळ औपचारिक उपस्थिती लावत आणि दाजींविषयी कोणतेही विधान न केल्याने भविष्यात पटेल यांची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच पटेल यांच्या रूपाने धुळे जिल्ह्यास मंत्रिपद मिळाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
शिरपूरमध्ये झालेल्या १३व्या सिंचन परिषदेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचे चांगलेच सिंचन केल्याचे दिसून येत आहे. धुळेच नव्हे तर, शेजारच्या नंदुरबार, नाशिक आणि जळगाव म्हणजे जवळपास संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. त्यास गटबाजीसह अन्यही कारणे आहेत. धुळे जिल्ह्य़ातील गटबाजी संपत नाही आणि काँग्रेसचा निर्विवाद विजयाचा इतिहास पुन्हा घडत नाही, असे खात्रीने म्हणण्याला दस्तुरखुद्द काँग्रेसचेच निष्ठावान, जुने-जाणते लोक मागेपुढे पाहणार नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळेच काँग्रेसला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यातून खास प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. शिरपूरच्या कार्यक्रमानंतर धुळ्यातही दोन मोठे कार्यक्रम असल्याची जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आ. अमरीश पटेल यांच्या मतदारसंघातील सिंचन आणि अन्य कामांची तोंडभरून स्तुती केली. त्याची उदाहरणे ते राज्यभरातील निरनिराळ्या सभांमधून देत आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांना तब्बल दोन-चार तास मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागली. पूर्वनियोजनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रोहिदासदाजींच्या शेतकरी मेळाव्यात केवळ दहा ते बारा मिनिटांचे भाषण ठोकून मुख्यमंत्री परतले. यामुळे  पटेल यांच्यासाठी सात-आठ तास आणि दाजींसाठी केवळ १५ मिनिटे, अशी मुख्यमंत्र्यांनी दिलेली वेळ प्रशासनाकडेच नाही तर राजकीय पटलावरही नोंदविली गेली.
धुळे तालुका काँग्रेसने रोहिदासदाजींच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. एक वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व मान्यवर मंडळी मंडपात उपस्थित झाली, परंतु दोन वाजले तरी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नव्हता. मुख्यमंत्री तर शिरपूरमध्ये रमले होते. सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री सिंचन परिषदेसाठी शिरपूरमध्ये दाखल झाले. नव्या इमारतीचे उद्घाटन आणि अन्य कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ दिला. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेविषयी बोलताना आर्थिक अनियमितता नकोच, असे सांगत एकप्रकारे आ. पटेल यांनाही इशारा दिल्याचे मानले जाते. शिरपूर साखर कारखाना बँकेच्या थकीत कर्जामुळे कारवाईत सापडला. कारखाना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा फलदायी ठरेल काय, अशीही चर्चा सुरू आहे. वीस वर्षांपासून राजकीय पटलावर चर्चेत राहिलेल्या अक्कलपाडा प्रकल्पाची किंमत किती पटीने वाढली, याबद्दल फार दु:ख वाटून न घेणाऱ्या नेत्यांना पुन्हा त्याच प्रकल्पाचे तुणतुणे भाषणातून वाजवावे लागते आणि श्रेयवाद कायम राहतो, यावरूनही दाजींच्या राजकीय वास्तवाची कल्पना मुख्यमंत्र्यांना आली असावी.