कोणत्याही चौकशीस तयार - गडकरी Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
alt

‘‘विविध आरोपांची राळ उडवून विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. परंतु त्यामुळे काही फरक पडणार नाही. पूर्ती ग्रुपसह कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. कुठलाही भ्रष्टाचार केला नसताना बिनबुडाचे आरोप आपणावर केले जात आहेत,’’ अशी तोफ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना डागली.
नवी दिल्लीहून सकाळी विमानाने आगमन झालेल्या गडकरी यांचे भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह स्वागत केले. खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री प्रवीण घुगे, शहर जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, ग्रामीणचे सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस अतुल सावे, डॉ. भागवत कराड, विजय साळवे, बबनराव नवपुते, राम बुधवंत आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या छोटेखानी सत्काराला उत्तर देताना गडकरी यांनी, विरोधी पक्षांना कितीही लक्ष्य केले तरी काही फरक पडणार नाही असे स्पष्ट केले. सोनिया गांधी, राहुल, रॉबर्ट वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना रस्ते, उड्डाणपुलांची कामे मोठय़ा प्रमाणात झाली. त्यात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार झाला नाही. उलट दोन्ही काँग्रेस आघाडीच्या राजवटीत रस्ते, सिंचन आदी कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचारामुळेच महागाईचा भस्मासुर तयार झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. यानंतर जळगाव जिल्ह्य़ातील फैजपूर येथे खासदार जावळे यांच्या साखर कारखान्यात होणाऱ्या उसाची मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी गडकरी येथून रवाना झाले.