पेट्रोलपंप दरोडय़ापाठोपाठ भरदिवसा २ लाखांची लूट Print

नांदेड/वार्ताहर
alt

शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी मोठा धुमाकूळ घातला. शुक्रवारी रात्री शहरालगत पेट्रोलपंपावर झालेल्या दरोडय़ानंतर शनिवारी भरदिवसा एका इसमाची दोन लाख रुपयांची बॅग चोरटय़ांनी लंपास केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड-पूर्णा रस्त्यावरील पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री दहा वाजता अनोळखी तिघे आले. शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी पंपावरील काम करणाऱ्या चौघांना मारहाण करीत त्यांच्याजवळील रोख रक्कम व पाच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी तेथील सर्व कर्मचाऱ्यांना स्नानगृहात कोंडून पलायन केले. तासाभरानंतर हा प्रकार लक्षात आला. भाग्यनगर पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी आले. पण २४ तास उलटले तरी यातील आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत.
रात्री घडलेल्या दरोडय़ाचा तपास ‘जैसे थे’ असतानाच शनिवारी भरदुपारी बाराच्या दरम्यान अनोळखी दोघा भामटय़ांनी शंकर शिल्लेवार (वय ६६) यांच्याजवळील २ लाख रुपये असलेली बॅग लांबविली. शिल्लेवार यांनी हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेतून रक्कम उचलली. नंतर ते आपल्या सन्मित्र कॉलनी परिसरातील निवासस्थानी आले. दुचाकी उभी करून घरात जात असतानाच मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावत पोबारा केला. शिल्लेवार यांनी आरडाओरड केली, पण मदतीला कोणीही धावून आले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी, दादगिरी, छेडाछेडी या पाठोपाठ आता चोरी, दरोडय़ाच्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. पोलीस निरीक्षक सुटीवर आहेत, तर गुन्हे विभागाचे प्रमुख किनवट येथे निवडणूक बंदोबस्तासाठी गेले आहेत, अशी सारवासारव करण्यात आली. या दोन्ही घटनांनी भाग्यनगर पोलिसांची कार्यक्षमता स्पष्ट झाली आहे.