प्रकाश पोहरेंचा यांचा जामीन अर्ज फेटाळला Print

सुरक्षा रक्षक खून प्रकरण
खास प्रतिनिधी
नागपूर
गोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
प्रकाश पोहरे यांनी कामावरून काढून टाकल्याने देशोन्नतीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. १३ ऑक्टोबरला सायंकाळी प्रकाश पोहरे खाजगी सुरक्षा रक्षकांना अंगरक्षक म्हणून सोबत घेऊन गोंडखैरी येथील छापखान्यात गेले. तेथे कर्मचाऱ्यांशी त्यांनी वाद घातला. प्रकाश पोहरे यांच्या इशाऱ्यावरून हरिकृष्ण रामप्यारे द्विवेदी याने झाडलेल्या गोळीत राजेंद्र दुपारे या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोहरे फरार झाले. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला. प्रकाश पोहरे यांना २३ ऑक्टोबरला पहाटे त्यांच्या अकोला येथील फार्म हाऊसमधून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
न्यायालयाने त्यांची दोनवेळा पोलीस कोठडी वाढवून दिली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यांनी ३० ऑक्टोबरला जामीन अर्ज सादर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. चांदवानी यांच्यापुढे प्रकाश पोहरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पोहरेंसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा किंवा प्रकाश पोहरे यांचा गोळीबार करण्याचा वा ठार मारण्याचा कुठलाही उद्देश नव्हता. या प्रकरणाचा तपासही पूर्ण झाला असल्याने आरोपी प्रकाश पोहरे यांना जामीन देण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. देशोन्नती श्रमिक संघाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी यास आक्षेप घेतला.