मालवणच्या तारकर्ली समुद्रात पुणे येथील दोन अभियंते बुडाले; तीन जण बचावले Print

वार्ताहर, सावंतवाडी
मालवण-तारकर्ली येथील समुद्रात पुणे येथील आयटी पार्कमधील दोन सॉफ्टवेअर अभियंते समुद्रात बुडाले, तर तिघेजण बालबाल बचावले. समुद्रात चेंडूने खेळणाऱ्या या तरुणांना अंदाज आला नसल्याने दोघांना समुद्राने पोटात घेतले.
पुणे औंध इंपोर्टेड आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर इंजिनीअर्स उत्सव जयंतकुमार शहा (२४, अहमदाबाद), व प्रशांत यादव (२४, गुडगाव-दिल्ली) हे समुद्रात
बुडाले. या दुर्दैवी प्रसंगातून पवन अपू शेट्टी (२३, रा. अहमदाबाद), निमिशा रामकृष्ण ओशरा (२३, रा. हिमाचल प्रदेश) व शाहील सत्तामोहन सिंग गोव्हर (२३, रा. दिल्ली) हे बालबाल बचावले.
पुणा येथील औंध इंपोर्टेड आयटी पार्कमधील पाच आॉफ्टवेअर इंजिनीअर्स आयटेन गाडी जीजे १ केडी ७०६४ ने रात्रौ १२ वा. पुणा येथून सिंधुदुर्ग
जिल्ह्य़ाकडे निघाले. मालवण-तारकर्ली या पर्यटन स्थळी सकाळी ११ वा. पोहोचले. तारकर्ली येथील खासगी रिसॉर्टमध्ये दुपारी त्यांनी मुक्काम करून १२ वा. समुद्रात गेले.
समुद्रावरील किनाऱ्याच्या पाण्यात चेंडूने ते पाचही जण खेळत होते. या समुद्राचा अंदाज त्यांना नव्हता तसेच भर दुपारी समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही नव्हते. तारकर्ली समुद्राच्या किनाऱ्यावर चेंडूने खेळताना चेंडू समुद्रात फेकला गेला. या उथळ पाण्याच्या दिशेने झेप घेणाऱ्या पाच जणांपैकी दोघांना समुद्राने पोटात घेतले, तर तिघांना बाहेर फेकल्याने ते बचावले.