गोवंश हत्या: शिवसेना, भाजपचा निषेध मोर्चा Print

रत्नागिरी
जिल्ह्य़ात काही तालुक्यांतील गावांमध्ये झालेल्या गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी शिवसेना, भाजप व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.
या वेळी मोर्चेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी राजीव जाधव यांना निवेदन सादर करून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, जिल्ह्य़ात शांतता व ऐक्याचे वातावरण कायम राहावे, यासाठी तमाम जनतेने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव जाधव व पोलीस अधीक्षक दीपक पांडय़े यांनी केले आहे.
शृंगारतळी (ता. गुहागर), मुरडे (ता. खेड) व कोंडिवरे (ता. संगमेश्वर) येथे बकरी ईदच्या निमित्ताने गोवंश हत्या केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होऊन विविध ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले, तसेच एका विशिष्ट समाजाच्या नावाने घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण तापले. जिल्ह्य़ातील सामाजिक शांतता, सलोखा बिघडविणाऱ्या त्या कृत्याचा सर्व स्तरांवरून जोरदार निषेध होऊ लागला.
कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणे गैर आहे, तसेच पशुहत्येचा निषेध करताना आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्याचे कृत्यही निषेधार्हच आहे.
जिल्ह्य़ात हिंदू-मुस्लीम बांधव गेल्या शेकडो वर्षांपासून गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यास्तव सामाजिक शांतता व सलोखा दाखविण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे. गो- हत्येचा मुस्लीम ओबीसी संघटनेनेही तीव्र निषेध केला असून, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अमजद बोरकर, डॉ. एम. डी. शेकासन आदींनी केले आहे.
गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना, भाजप हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाने धडक दिली. या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, आनंद मराठे यांच्यासह १५० जणांची उपस्थिती होती.