पोहरेंचा जामीन अर्ज फेटाळला Print

सुरक्षा रक्षक खून प्रकरण
खास प्रतिनिधी, नागपूर
गोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
प्रकाश पोहरे यांनी कामावरून काढून टाकल्याने देशोन्नतीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. १३ ऑक्टोबरला सायंकाळी प्रकाश पोहरे खाजगी सुरक्षा रक्षकांना अंगरक्षक म्हणून सोबत घेऊन गोंडखैरी येथील छापखान्यात गेले. तेथे कर्मचाऱ्यांशी त्यांनी वाद घातला. प्रकाश पोहरे यांच्या इशाऱ्यावरून हरिकृष्ण रामप्यारे द्विवेदी याने झाडलेल्या गोळीत राजेंद्र दुपारे या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोहरे फरार झाले. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला. प्रकाश पोहरे यांना २३ ऑक्टोबरला पहाटे त्यांच्या अकोला येथील फार्म हाऊसमधून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने त्यांची दोनवेळा पोलीस कोठडी वाढवून दिली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यांनी ३० ऑक्टोबरला जामीन अर्ज सादर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. चांदवानी यांच्यापुढे प्रकाश पोहरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पोहरेंसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा किंवा प्रकाश पोहरे यांचा गोळीबार करण्याचा वा ठार मारण्याचा कुठलाही उद्देश नव्हता. या प्रकरणाचा तपासही पूर्ण झाला असल्याने आरोपी प्रकाश पोहरे यांना जामीन देण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. देशोन्नती श्रमिक संघाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी यास आक्षेप घेतला. आरोपी प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या जिवाला कुठलाही धोका नसतानाही बंदुकधारी सुरक्षा रक्षक आणला. हा बंदुकधारी रक्षक उत्तर प्रदेशातील असून त्याची संबंधित कंपनीत नियुक्तीदेखील नव्हती. तरीदेखील त्याला आणण्यात आले आणि दुसऱ्या दिवशीचे त्याचे परतीचे तिकीटही काढून ठेवण्यात आले होते. त्यामुळे हा निर्घृण खून आहे. आरोपी प्रकाश पोहरे यांच्याविरुद्ध २७ गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांनी दोनवेळा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. त्यामुळे आरोपी मोकळा झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणेल. साक्षीदारांची जबानी नोंदवायची आहे तसेच ओळखपरेडही व्हायची आहे. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला. वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. प्रकाश पोहरे यांच्यातर्फे अ‍ॅड. सुनील मनोहर व रमेश गायकवाड, सरकार पक्षातर्फेअतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी व देशोन्नती श्रमिक संघातर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, रूपेश जयस्वाल, रोहिणी खापेकर यांनी काम पाहिले.