आम्हीही मराठी, दुसरीकडून टपकलो नाही Print

शिवसेना- मनसेवर अजित पवारांचे टीकास्त्र
प्रतिनिधी
पिंपरी
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच िपपरी बालेकिल्ल्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी चौफेर फटकेबाजी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना जमीन दिल्याचे जोरदार समर्थन करतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मात्र चांगलेच चिमटे काढले. शिवसेना व मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावर कडाडून हल्ला चढवत, ‘आम्हीही मराठी आहोत, दुसरीकडून टपकलो नाही’, असे खोचक विधानही केले. पिंपरी-चिंचवडने नेहमीच घरच्यासारखे प्रेम दिले. मात्र, राजीनामा देताना येथील तीनही आमदारांना विश्वासात घेतले नाही, ही चूकच झाली, अशी कबुलीही त्यांनी दिली. सांगवीत उभारलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे आदींसह मोठय़ा संख्येने पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पवार म्हणाले, तो केजरीवाल चार वाजले की पत्रकार परिषद घेतो. कोणी राजकारणात यावे किंवा नाही, यावर बंधन असायचे कारण नाही. मात्र खोटे-नाटे आरोप करून प्रसिध्दी मिळवण्याचे काम त्यातून केले जाते. नितीन गडकरी यांना चार दिवसात जमीन दिली, त्यात तुमच्या बापाचे काय जाते, चांगल्या कामासाठी मदत केली तर बिघडले कुठे, असे ते म्हणाले.