..तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील Print

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
वार्ताहर, जळगाव, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतमालास रास्त भाव मिळण्याबरोबर ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार मिळेल व शहराकडे येणारे लोंढे थांबतील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष खा. हरिभाऊ जावळे, खा. ए. टी. पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी व भाजपचे इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. सध्या होत असलेल्या आरोपांविषयी यावेळी गडकरी यांनी बोलण्याचे टाळले. निवडणुका येतात व जातात आणि निवडून येणारे निवडून येतात. सर्वसामान्य माणूस मात्र आहे तिथेच राहतो, असे सांगत त्यांनी महागाईचा दर १८ टक्के असल्याने गरीब गरीबच तर श्रीमंत आणखी श्रीमंत होत असल्याची खंत व्यक्त केली. देशातील लाखो युवक बेरोजगार आहेत. कर्जबाजारीपणामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करतात. ही राजकारणाची प्रेरणा होऊ शकत नाही, असे नमूद करत राजकारणाची व्याख्याच आपण विसरल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाचा उपयोग आज विविध पदे मिळविण्यासाठी केला जातो. त्यास मधुकर कारखाना हा अपवाद असून येथे तसे नाही म्हणून हा कारखाना ३७ वर्षे अखंडपणे सुरू असल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
शेतमालास भाव मिळाला तर शेतकरी समृद्ध होईल. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोजगार तरूणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे शहराकडे येणारे लोंढे थांबतील, असेही गडकर यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचार करणारे नेते सध्या आर्थर रोड तुरूंगात असल्याचे सांगत सुरेश जैन यांचे नांव न घेता टोला लगावला.