तीन वर्षांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची अजितदादांनीच दिली ग्वाही! Print

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा फसवी ठरल्याने तोंडघशी पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रसने पुन्हा २४ तास पाणी देण्याचे गाजर दाखवण्यास सुरूवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत बोलताना येत्या ३ वर्षांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. मावळातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ८ महिने स्वच्छ पाणी घेता यावे, यासाठी बंद नळ योजना पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते शिवराज्याभिषेक अशा १८ शिल्पचित्रांचा समावेश असलेल्या सांगवीतील शिवसृष्टी उद्यानाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त अनुपकुमार यादव, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे, स्थानिक नगरसेवक प्रशांत शितोळे, सोनाली जम, सुषमा तनपुरे, शैलजा शितोळे, अतुल शितोळे, माई ढोरे, वैशाली जवळकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले,‘‘ सेझ, प्राधिकरण, पीएमपी, पीएमआरडीए एकत्र करून त्यावर सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करून शहराचे प्रश्न सोडवणार आहे. संरक्षण खात्याच्या अडचणी शरद पवार यांच्या कानावर घातल्या असून त्यांच्यामार्फत संरक्षणमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पुणे व िपपरी पालिकेच्या प्रश्नांविषयी बैठक होईल. जकातीचा प्रश्न गंभीर असून उद्योगधंदे टिकले तरच अन्य उद्योग जगणार आहेत. शहरातील सांस्कृितक दर्जा वाढला पाहिजे. ठराविक वर्गाचा विचार करून चालणार नाही. अनधिकृत बांधकामप्रकरणी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पुर्वी पुण्याला प्राधान्य देण्याची मानसिकता होती. आता सर्व सुविधा शहरातच उपलब्ध आहेत.’’ पूर्वीइतका वेळ शहराला देता येत नाही, असे मान्य करत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी जगताप यांनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात होणाऱ्या नियोजित प्रकल्पांची माहिती दिली. प्रशांत शितोळे यांनी प्रास्तविक केले.

शहरातील नद्यांमध्ये मोठे प्रदूषण
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे. नद्यांमध्ये थेट घाण सोडली जाते, त्यामुळे नदीपात्रात घाणीचे साम्राज्य झाले आहे, त्यातून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून मासे मरण्यासारखे अनेक प्रकार होतात, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. लगतच्या भागात पाणी देण्याच्या मुद्दय़ावर बोलताना  पाण्याचे राजकारण नको, असे सूचित करीत ते आपले बांधव आहेत, त्यांच्याविषयी मानवतेचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे मत पवारांनी व्यक्त केले.