परिचारिकेचा विनयभंग; दोन आरोपींना अटक Print

हिंगोली/वार्ताहर
वसमत तालुक्यातील हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर श्याम शिवलिंगप्पा महाजन व भरत साहेबराव सारंग या दोघांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परिचारिकेने प्रसंगावधान राखून ओरड घातल्यामुळे परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक अशोक घोरबंड यांच्या ताब्यात दिले.
हयातनगर आरोग्य केंद्रातील रुग्णालयात काम केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या रात्री निवासस्थानी झोपल्या होत्या. आरोपी श्याम महाजन व भरत सारंग यांनी तिच्या निवासस्थानाची कडी काढली. त्या घरात एकटय़ाच असल्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. जोरात आरडाओरड करताच परिसरातील आजूबाजूचे लोक तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी ताबडतोब जमले. त्यांनी तत्काळ हट्टा पोलिसांना फोनवरून माहिती दिली. सहायक पो. नि. अशोक घोरबांड व सहकाऱ्यांनी आरोपींना अटक केली. परिचारिकेच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.