उसाला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त भाव - अमित देशमुख Print

लातूर/वार्ताहर
मराठवाडय़ातील साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सरस असून यावर्षी मांजरा परिवारातील कारखाने उसाला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक भाव देतील, अशी घोषणा आमदार अमित देशमुख यांनी मांजरा, विकास, जागृती, प्रियदर्शनी व रेणा साखर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी बोलताना केली.
आमदार देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केले. हा वारसा जपत पुढे न्यायचा असून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद वाढत जावा, यासाठीच सर्वानी झटण्याचा निश्चय करण्याची गरज आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी काटेकोर नियोजन करून व गाळप खर्चात काटकसर करून शेतकऱ्याला अधिक भाव देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वीजनिर्मिती, इथेनॉल, अल्कोहोल याच्या उत्पादनामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या उसाला अधिक भाव देण्याची भूमिका घेतली आहे.
यावर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे. मात्र, जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा मांजरा परिवारावर विश्वास असल्यामुळे सर्व जण ऊस गाळपासाठी आणतील यावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा उसाला अधिक भाव देण्याचा संकल्प मांजरा परिवाराने केला असल्याचे ते म्हणाले.या वेळी आमदार वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अ‍ॅड. व्यंकट बेंद्रे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. विकास साखर कारखान्याच्या कार्यक्रमात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.