मद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ बारामतीमध्ये - डॉ. अभय बंग Print

पुणे
प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र असे रूपांतर झाले असून राज्यातील मद्यक्रांतीचे सत्तापीठ बारामतीमध्ये आहे, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी रविवारी हल्ला चढविला.
आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित ‘पुलोत्सव’ साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते डॉ. अभय बंग यांना पुलं स्मृती कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.  डॉ. अभय बंग म्हणाले, राज्यामध्ये ३० हजार कोटी रुपयांची दारू निर्मिती होत आहे.
राज्य सरकार आठ हजार कोटी रुपयांचा महसूल दारूच्या उत्पादनातून कमावत आहे.
मद्यक्रांतीचे सत्तापीठ पुणे जिल्ह्य़ातील बारामती येथे आहे. वाइन म्हणजे फळांचा रस अशी भलामण केली जात आहे. किंगफिशरसोबत जॉइंट व्हेंचर केले जात आहे. अर्थात आता किंगफिशरचे विमान जमिनीवर आले आहे. ही दारूची महानिर्मिती आपले मार्केट शोधणारच. त्यातूनच रेव्ह पार्टीसारखे प्रकार
घडत आहेत. पुणे विद्यापीठामध्ये वाइन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. दारूची निर्मिती, उदात्तीकरण आणि प्रशिक्षण द्याल तर ही दारू जाणार कोठे? ती युवकांमध्ये रिचवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. पुलंच्या प्रेरणेतून डॉ. अनिल अवचट यांनी पुण्यामध्ये मुक्तांगणची सुरुवात केली तेच शहर ‘मद्यमुक्त पुणे’ क्रांतीची वाट पाहत आहे.