पोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी Print

खास प्रतिनिधी
नागपूर
‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
राजेंद्र दुपारे हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद वाटत असून या प्रकरणी पोहरे यांच्याविरूद्ध कटकारस्थानाचा आरोप लावावा अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे उज्ज्वला दुपारे यांनी म्हटले आहे.
गोंडखैरीच्या गोळीबार घटनेची र्सवकष चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका ‘इंडियन लँग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन’ने (इलना) घेतली आहे. घटनेच्या दिवशी पोहरे नव्याने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांची डय़ुटी समजावून सांगण्यासाठी गेले होते. तेथे सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न तसेच झटापट झाली. या झटापटीत बंदुकीतून गोळी निघून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
मालक-कामगार वाद समजून पोलीस याबाबत प्रारंभी गंभीर नव्हते. केवळ कामगारांच्या दबावाखाली प्रकाश पोहरे यांना चुकीच्या आरोपात फसवू नये, पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, आत्मसंरक्षणार्थ केलेल्या प्रयत्नांना गुन्हा मानू नये, असे ‘इलना’चे अध्यक्ष परेश नाथ यांनी कळमेश्वर पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.