विहूर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या Print

मुरुड,
विहूर ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाचे असे विहूर धरण गेट वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने विहूर, ऊसरोली, मजगाव, नांदगाव या ग्रामपंचायतींमधील सुमारे २० हजारांवर लोकवस्तींना ऐन हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. याबाबत तातडीने विहूर ग्रामस्थांनी उपसरपंच इकरार मोदी व ग्रामपंचायत सदस्य सज्जाद उलडे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाज सचिव मझहर उलडे, इनायत उलडे, हैदर पंगारकर, खालीद लसने, तलदा कचकौल, बुनियाद उलडे, ईर्षांद हलडे आदींसह नायब तहसीलदार दीपक आंबुकर, गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या वेळी या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी विहूर धरणात शिल्लक राहिलेले पाणी फक्त विहूर ग्रामपंचायत ग्रामस्थांना मिळावे व इतर ग्रामपंचायतींचे पाणी बंद करण्याची मागणी केली आहे. या वेळी मुस्लीम समाजाचे सचिव मझहर उलडे यांनी सांगितले की, विहूर धरणाचे गेल्या वर्षी एक कोटींपेक्षा जास्त रकमेचे काम करण्यात आले, पण गेट वॉलच्या अंदाजपत्रकात १३ लाख रुपये किंमत दाखविण्यात आली; परंतु प्रत्यक्षात गेट वॉल बसविताना निकृष्ट दर्जाचे वॉल बसविण्यात आल्याने आम्हाला ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. विहूर धरणाच्या कामाची सखोल चौकशी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी व ग्रामस्थांना न्याय मिळून द्यावा, अशी मागणी केली आहे. गेट वॉलबाबत ग्रामस्थांनी या अगोदर अनेक तक्रारी केल्यानंतर ठेकेदारामार्फत दोन वेळा काम केले, पण प्रत्यक्षात त्याचा फायदा काहीही झालेला नाही. या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन चौकशी करावी व विहूर ग्रामस्थांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करीत अन्यथा आम्हाला उपोषणास बसावे लागेल, असा गर्भित इशारा विहूर ग्रामस्थांनी दिला आहे.