नकारात्मक भूमिकेमुळे खोपोलीस्थित आयटीआय केंद्राचे स्थलांतर रखडले Print

खोपोली,
खोपोलीतील लघू औद्योगिक वसाहतीत तब्बल १५ वर्षे बंद पडलेल्या भयावह, असुरक्षित, प्रचंड गैरसोयीच्या वास्तूत गुरे-ढोरे राहू शकणार नाहीत, अशा मे. काफ वर्कशॉपमध्ये शासनाने खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून विक्रम केला. या विक्रमाची ८ वर्षे पूर्ण झाली. तद्अनुषंगाने ‘लाल फितीचा कारभार इच्छाशक्तीच्या अभावामुळे खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची परवड’, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून अन्य पक्ष व पत्रकार संघातर्फे आयटीआय बचाव मोहीम’ या शीर्षकाखाली दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची शासकीय यंत्रणेला व आयटीआयशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, अशा अविर्भावात वावरणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना अखेर दखल घ्यावी लागली. दसऱ्याच्या दिवशी खोपोलीस्थित खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था खोपोली न. पा. हद्दीतील शेकीन प्रभागातील सुसज्ज वास्तूत स्थलांतरित होणार होती, पण महावितरण संस्थेतील अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे हे स्थलांतर रखडले आहे.
संचालक प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली येथे कार्यरत असलेल्या खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फिटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, ड्रेसमेकिंग या सहा ट्रेडचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. ड्रेसमेकिंग व इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाच्या एक एक तर उर्वरित फिटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिकलच्या दोन-दोन अशा एकूण दहा तुकडय़ांमधून १८५ विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. एक प्राचार्य, ७ निदेशक, तासिका तत्त्वावर एक निदेशक, ३ कार्यालयीन कर्मचारी असा एकूण १२ स्टाफ येथे अस्तित्वात आहे. रिक्त असलेली निदेशकांची तीन व चतुर्थ कर्मचाऱ्यांची दोन अशी एकूण ५ पदे अद्याप भरलेली नाहीत, असे आढळून आले आहे.
वावंढळ (चौक) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ५० एकर गुरुचरणांतील जागेपैकी ५ एकर जागेत खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. खोपोली शहरातून तालुक्याचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हलविले जाऊ नये ही असंख्य पालकांची इच्छा होती. त्यामुळे लोकसत्ताने पालकांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. खोपोली न. पा. हद्दीत चिंचवली शेकीन येथे राहणाऱ्या तेजस्विनी देशमुख यांनी सिटी सव्‍‌र्हे क्र. ९४० अंतर्गत तळमजला व दोन मजले, असे ७६६३.३४ चौरसफूट- पूर्ण बांधकाम केलेली, आपल्या अखत्यारीतील सर्व सोयीसुविधाने युक्त वास्तू खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याची तयारी दर्शविली. दरमहा ७३.७२२ रुपये (इलेक्ट्रिक बिल वेगळे) भाडेतत्त्वावर, ही वास्तू घेण्याच्या प्रस्तावास प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाचे संचालकांनी मंजुरी दिल्यामुळे खा. औ. केंद्र दसऱ्याच्या दिवशी चिंचवली- शेकीन येथील नूतन वास्तूत स्थलांतरित होण्याचे निश्चित झाले होते. तद्अनुषंगाने शासनाने १ ऑक्टोबर २०१२ ते ३० सप्टेंबर २०१५ असा तीन वर्षांचा भाडेकरार देशमुख यांच्याबरोबर केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला थ्री फेज व ५० किलोवॉट विद्युतपुरवठा आवश्यक असल्यामुळे तेजस्विनी देशमुख यांनी महावितरण कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. नियमाप्रमाणे आवश्यक फी भरण्याची तयारी दर्शविली. विद्युतपुरवठा आज देतो, उद्या देतो असे सांगून महावितरण संस्थेतील नकारात्मक प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात विद्युतपुरवठा उपलब्ध केला नाही, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी होणारे स्थलांतर रखडले. ५० किलोवॉट क्षमतेच्या थ्री फेज विद्युतपुरवठय़ासाठी नवीन ट्रान्स्फॉर्मरची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने २ लाख ६९ हजार ७४० रुपये खर्चाचे इस्टीमेट सादर केले. संचालकांकडून नवीन ट्रान्स्फॉर्मरच्या खर्चाला मंजुरी मिळणे व प्रत्यक्षात शासनाकडून निधी उपलब्ध होणे या बाबींना किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण असल्यामुळे औद्योगिक केंद्राचे नूतन वास्तूत स्थलांतर होणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला. अप्रत्यक्षात जाणीवपूर्वक प्रश्न  निर्माण करणारी महावितरण संस्था किती किलोवॉट विद्युतपुरवठा करू शकते, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महावितरण कंपनीने १५ किलोवॉट थ्री फेज विद्युतपुरवठा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके सादर करताना योग्य ते नियोजन करण्याचा व १५ किलो वॉटमध्ये संस्थेची तात्पुरती गरज भागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी वेगाने सूत्रे हलविली जात आहेत.
 वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यामुळे विद्युतपुरवठा उपलब्ध करून द्यावाच लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नकारात्मक भूमिकेत वावरणारे महावितरणचे अधिकारी अधिकच अस्वस्थ झाल्याचे वृत्त आहे. महावितरण तेजस्विनी देशमुख यांच्या वास्तूला १५ किलो व्ॉट थ्री फेज विद्युतपुरवठा केव्हा उपलब्ध करून देणार व खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर नूतन वास्तूत दिवाळीपूर्वी होणार का? याकडेच खोपोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे हे मात्र तितकेच खरे!