श्रीवर्धन मधील पत्रकार संदीप जाधव यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध Print

महाड,
श्रीवर्धन मध्ये झालेल्या दंगलीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संदीप जाधव यांच्यावर कांही जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा कॅमेरा फेकण्यात आला. या वेळी बंदोबस्ताकरिता उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका बजावली. या घटनेचा रायगड जिल्हय़ातील पत्रकार संघटना व सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध केला असून आमच्या न्याय्य हक्कांसाठी वेळ आल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असा इशारा रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण बाथम यांनी दिला आहे. पत्रकारांवर हल्ले होत असल्याने या पूर्वी वेळोवेळी शासनाला निवेदने सादर करण्यात आली परंतु शासनाकडून दखल घेतली जात नाही. संदीप जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण बाथम रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, पत्रकार हर्षद कशाळकर, ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप, पत्रकार भारत रांजणकर, मोहन जाधव, राजन बेलकर, आविष्कार देसाई, रवींद्र लाड यांच्यासह जिल्हय़ांतील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सदस्य संदीप जाधव यांच्यावर श्रीवर्धनमधील दंगलीचे वृत्त घेण्यासाठी जात असताना त्यांच्या समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. दंगलीच्या बंदोबस्ताकरिता तैनात केलेले पोलीसदल समोर असताना त्यांनी केवळ पाहण्याची भूमिका बजावली. वास्तविक श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधक कारवाईचे कलम लावण्यात आलेले असताना समाजकंटकांकडून तणावाचे वातावरण केले जात असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून पत्रकार जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.