रोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे Print

अलिबाग,
गॅसधारक नागरिकांकडून एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शनसंबंधित के.वाय.सी. अर्ज भारत गॅस एजन्सीकडे संपले, बाहेरून अर्ज आणा असे सािंगतल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले. परंतु बाहेरील आणलेला अर्ज चालणार नाही, असे सांगत अरेरावी केल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करण्याबरोबर रांगाच रांगा आणि हेलपाटे मारावे लागल्याने याबाबत तहसीलदार रोहा यांच्याकडे तकार करण्यात आली आहे.  
   शासनाकडून गॅस सिलेंडर ई.के.वाय.सी. अर्ज  ग्राहकांकडून भरून घेणे चालू असून त्या संबंधित अर्ज त्या त्या गॅस वितरकांकडून देण्यात येतात; परंतु रोहा येथील रायकर पार्कमधील भारत गॅस एजन्सीकडे अर्ज संपले आहेत. खासगी दुकानदारांकडून अर्ज आणा, असे सांगितल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले असता बाहेरील आणलेला अर्ज चालणार नाही, असे अरेरावीच्या भाषेत सांगत पुन्हा अर्ज भरा, असे स्पष्ट केल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन कराव लागला. या अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अर्ज घेण्याची वेळ दुकानदारांच्या सोयीनुसार ठरविली गेली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गॅस वितराकांच्या दुकानासमोर गर्दी झालेली दिसते. या वितरकांचे आडमुठे धोरण व कर्मचारीवर्गाच्या अरेरावीच्या विरोधात रोहा शहर राष्ट्रवादी शहर सरचिटणीस सूर्यकांत शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
२९ आक्टोबर २०१२ रोजी ४ वाजता स्वत: सूर्यकांत शिंदे अर्ज घेण्यास उभे असताना, अर्ज संपले असून ४.२५ वाजता ऑफिस बंद करण्याची वेळ झाली आहे, असे अरेरावी भाषेत महिला कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे उपस्थित ३०० ते ४०० ग्राहकांचा संताप अनावर होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक लोकांच्या तक्रारी लक्षात घेत शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
या अर्जात शिंदे यांनी, अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची घाई होत असताना त्यांना उद्धट भाषेत बोलणे, अर्ज संपले असे सांगून त्यांना बाहेरून ४ रुपये खर्च करून अर्ज आणण्यास सांगणे, नंतर हे अर्ज न स्वीकारणे, बाहेर अर्ज कसे पोहोचले किंवा त्यांच्याकडे कसे उपलब्ध झाले. त्यामध्ये भष्टाचार आहे का? आठवडय़ातून दोन दिवस ३ ते ५ वेळेत अर्ज भरणे. असे अनेक मुद्दे शिंदे यांनी मांडले असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.