जनजागृती ग्राहक मंच-रायगडचा त्रवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर Print

खोपोली,
जनजागृती ग्राहक मंच- रायगड यांच्या तालुका, ग्रामशाखा व उपशाखा कार्यकर्ता मंडळ व जिल्हा कार्यकारी मंडळ यांची मुदत ३१ डिसेंबर २०१२ रोजी पूर्ण होत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रा. सुरेंद्र दातार यांनी मंचाचा १ जाने. २०१३ ते ३१ डिसेंबर २०१५ या त्रवार्षिक कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
२० ऑक्टोबर रोजी मतदारयादी जाहीर केली आहे. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत तालुका शाखेच्या निवडणुकीतील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज तालुका शाखेच्या कार्यालयात, कार्यालयीन बँकेत स्वीकारण्यात येणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत राहणार आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान, सायंकाळी ५.३० वाजता मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ग्रामशाखा व उपशाखा कार्यकर्ता मंडळाच्या निवडणुका १३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. या निवडणुकांचा अहवाल व निकाल स्थानिक निवडणूक अधिकारी व तालुका अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीसह २० डिसेंबर २०१२ पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. विसर्जित जिल्हा कार्यकारी मंडळाची व नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारी मंडळाची संयुक्त सभा रविवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तांत्रिक विद्यालय वरसोली, अलिबाग येथे होणार आहे. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाकडे, मावळत्या तथा विसर्जित कार्यकारी मंडळाकडून मंडळाचा पदभार सुपूर्द केल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारी मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष (२), कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव (३) यांच्या नावांची घोषणा करेल. या निवडणुकीत २०११-१२ या आर्थिक वर्षांत नोंदणी झालेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. तालुकानिहाय- निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलेले निवडणूक अधिकारी असे- अलिबाग- नितीन पाटील (खोपोली), अ‍ॅड. रेश्मा मयेकर (अलिबाग), पेण- प्रा. शाम जोगळेकर (अलिबाग), तेलकर (पेण), पनवेल- नितीन वैद्य (रसायनी), वि. न. वत्सराज (पनवेल), खालापूर- विनोद मेहेर (पेण), विठ्ठल केणी (रसायनी), कर्जत- संजय पाटील (खोपोली) भालचंद्र रवळनाथ कदम (कर्जत), उरण- पु. ग. सावंत (पनवेल), बी. पी. म्हात्रे (पनवेल), महाड- नरे (पोलादपूर), दिलीप दळवी (महाड), पोलादपूर- दिलीप दळवी (महाड), रघुनाथ भिलारे (पोलादपूर) ही माहिती मंचाचे खोपोली शहर अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.