महाडमधील पालिकेच्या दुकान गाळेधारकांचे भवितव्य अंधारात! Print

महाड,
शहरातील शिवाजी चौकामध्ये पालिकेची मालकी असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्या परिसरातील दुकानाचे गाळे पाडून टाकण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये व्यवसाय करीत असलेल्या दुकान गाळेधारकांना दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी अंधारात आहे.
तीसवर्षांपूर्वी महाड शहराची गरज आणि सुविधा फारच कमी होत्या. काळानुसार अनेक बदल झाल्यानंतर नागरी सुविधांचा विचार करून पालिकेने अनेक सुधारणा घडवून आणल्या. आज ज्या ठिकाणी वसाहती दिसत आहेत पंचवीस वर्षांपूर्वी मोकळी जागा अथवा शेतजमिनी होत्या. प्रभात कॉलनी, कोटेश्वरी तळे, जवाहर सोसायटी, पंचशीलनगर, नवे नगर, गोमुखी आळी, भीम नगर, काकरतळे इत्यादी परिसरामध्ये अनेक मोठय़ा इमारती उभारण्यात आल्या. शिवाजी चौक परिसर पंचवीस वर्षांपूर्वी शेतजमीन परिसर होता. पालिकेचे माजी अध्यक्ष कै.सुधाकर सावंत यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक विकसित झाला. एस.टी. बस स्थानक ते शिवाजी चौक आणि त्यापुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला. चवदार तळे सौंदर्यीकरण करण्यात आले, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून दिला. अशाच प्रकारे शिवाजी चौक ते गांधारी नाका हा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला, रमाबाई विहारची भव्य इमारत उभारण्यात आली. शिवाजी चौकामध्ये आकर्षक बेट तयार करण्यात आले. मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. एस.टी. बस थांबा आणि जिजामाता उद्यानाबरोबर पालिकेने मोकळय़ा जागेमध्ये दुकानाचे गाळे उभारले. यातून पालिकेचा महसूल वाढला आणि बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध झाली. अशाच प्रकारे मच्छी मार्केट परिसरामध्ये दुकानाचे गाळे उभारण्यात आले. प्रशस्त रस्ता तयार करण्यात आल्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना सोईचे झाले. पंधरा वर्षांपूर्वी कै. सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला शिवाजी चौक आज शहराचा मध्यवर्ती परिसर झाला आहे. याच परिसरामध्ये हुतात्मा स्मारकाची इमारत आहे. नगरपालिकेच्या ताब्यात असल्याने स्मारकाची देखभाल चांगल्या प्रकारे केली जाते. स्मारकाजवळ पालिकेच्या मालकीची मोकळी जमीन असून त्या ठिकाणी नवीन अद्ययावत प्रशस्त प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याला सादर करण्यात आला आहे. त्यासाठी दुकानाचे गाळे काढण्याचा विचार पालिका करीत असताना गाळेधारकांची पर्यायी व्यवस्था कशा प्रकारे करावी, असा पश्न प्रशासनासमोर आहे. त्याचबरोबर गाळेधारकांचे भवितव्यदेखील अंधारात आहे.
शिवाजी चौक परिसरात आज एकूण चाळीस दुकानांचे गाळे आहेत. त्यामध्ये अपंग, आर्थिकदृष्टय़ा मागासलेले बेरोजगार तरुण याच्या नावावर आहेत. प्रत्यक्षात ज्यांच्या नावावर गाळे पालिकेने दिले आहेत त्यांतील वीस टक्केदेखील गरजूंच्या ताब्यात गाळे राहिलेले नाहीत. ज्यांच्या नावे गाळे आहेत त्यांनी इतरांना ज्यादा भाडे आकारून वापरण्यास दिले आहेत. पालिकेच्या गाळय़ांमध्ये आज जे व्यवसाय करीत आहेत ते बहुतेक पोट भाडेकरू असताना केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी पालिकेच्या गाळय़ांचा गैरवापर केला जात आहे. शिवाजी चौक हे धंदय़ाचे चांगले ठिकाण झाल्याने काही नगरसेवकांनीदेखील गाळे ताब्यात घेऊन धंदे सुरू केले आहेत. शासन नागरिकांच्या सोई-सुविधांकरिता कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना पालिकेचे लोकप्रतिनिधी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मूळ गाळेधारकांना बाजूला सारून आपला फायदा करून घेत असल्याचे आढळून येते. शासनाने या गाळेधारकांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.