उत्तर महाराष्ट्रात पाच पालिकांसाठी ६० टक्के मतदान Print

प्रतिनिधी
नाशिक
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांसाठी ६० ते ६५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमधील धक्काबुक्कीचा अपवाद वगळता इतरत्र मतदान शांततेत झाले. पाचही ठिकाणच्या पालिकांची मतमोजणी सोमवारी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांसाठी अनुक्रमे सुमारे ६० व ८० टक्के मतदान झाले. एकूण १९ पैकी एका जागेवर याआधीच शिवसेनेचा उमेदवार अविरोध निवडून आला आहे. त्र्यंबकेश्वर पालिकेसाठी सुमारे ८० टक्के मतदानाची नोंद झाली. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर, तळोदा यांसह नंदुरबार पालिकेसाठी मतदान झाले.
नंदुरबारमध्ये सुमारे ७० टक्के मतदान झाले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही पालिका मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले आहे. नवापूरमध्ये १८ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात असून सुमारे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व पक्ष स्वतंत्रपणे मैदानात आहेत. तळोद्यात १७ जागांसाठी ५७ उमेदवार नशीब अजमावीत असून सुमारे ६७ टक्के मतदान झाले.