ओबीसी असल्यामुळेच ‘टार्गेट’-छगन भुजबळ Print

प्रतिनिधी
नाशिक
ओबीसी असल्यामुळेच आपणावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून ‘टार्गेट’ केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम, पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला आहे.   येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात रविवारी महात्मा फुले समाज विकास संस्थेच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्र माळी समाज विभागीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माळी असल्यामुळे आपणास, वंजारी असल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना तर मागासवर्गीय असल्यामुळे रामदास आठवले यांना लक्ष्य केले जात आहे. याआधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मागासवर्गीय असल्यामुळे तर महात्मा फुले यांच्यासह इतरांना ओबीसी असल्यामुळे त्रास सहन करावा लागला . प्रचलित राजकीय व्यवस्थेतही हेच पाहावयास मिळत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. ‘डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल’चा वापर ओबीसींसाठी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रीपदी असताना ओबीसी असल्यामुळेच आपणास राजीनामा द्यावा लागला होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ओबीसींचा नेता असल्यामुळेच गैरव्यवहारांचे आरोप केले जात आहेत. ओबीसींच्या २२७ जातींनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.