‘पोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवावा’ Print

खास प्रतिनिधी
नागपूर
‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला दुसरी बाजू असल्याने कोणताही पक्षपात होऊ नये यासाठी र्सवकष चौकशीची गरज असल्याचे ‘इंडियन लँग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन’ने (इलना) म्हटले आहे.
प्रकाश पोहरे यांनी राजेंद्र दुपारे यांची हत्या केल्याचा आरोप उज्ज्वला दुपारे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कटकारस्थानाचा  आरोप लावावा अशी मागणी सातत्याने होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांनी म्हटले आहे.  गोंडखैरीच्या घटनेत मरण पावलेल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतानाच या संपूर्ण घटनाक्रमाची र्सवकष चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका ‘इंडियन लँग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन’ने (इलना) घेतली आहे. घटनेच्या दिवशी पोहरे नव्याने नियुक्त सुरक्षा रक्षकांना त्यांची डय़ुटी समजावून सांगण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे त्यांच्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न तसेच झटापट झाली. या झटापटीत बंदुकीतून गोळी निघून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मालक-कामगार वाद समजून पोलीस या घटनेप्रति गंभीर नव्हते. केवळ कामगारांच्या दबावाखाली प्रकाश पोहरे यांना चुकीच्या आरोपात फसवू नये, पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, आत्मसंरक्षणार्थ केलेल्या प्रयत्नांना गुन्हा मानू नये, असे ‘इलना’चे अध्यक्ष परेश नाथ यांनी कळमेश्वर पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.