वर्षांचे गणित कोलमडणार? Print

उजनीतील पाण्याचा नियोजनबाहय़ बेसुमार वापर
प्रतिनिधी
सोलापूर
संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याच्या वापराचे गतवर्षी नियोजन होऊनदेखील अंतिम पर्वात पाण्यासाठी संघर्ष होऊन ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ अशी स्थिती निर्माण झाली आणि तब्बल ३२.२६ टीएमसी पाण्याचा नियोजनबाहय़ वापर झाल्याचे दिसून आले आहे. सध्या उजनी धरणातील पाण्याचा साठा जेमतेम म्हणजे केवळ १३ टक्क्यांच्या घरात असताना त्यावर पुढील वर्षभराचे नियोजन करताना प्रशासनाला अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागणार आहे, तर त्यातून पुन्हा राजकीय संघर्ष उद्भवण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
दरम्यान, उजनी धरणातील पाण्यावर आता विसंबून न राहता कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लागणे ही काळाची गरज असल्याचे सर्वच लोकप्रतिनिधी मान्य करतात. परंतु त्याबाबत माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता एकही लोकप्रतिनिधी शासनदरबारी तोंड उघडत नाही. त्यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्हय़ात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर उजनी धरणातील पाण्याच्या वापराचे शासनस्तरावर नियोजन केले जाते. मागील २०११-१२ वर्षी या धरणातील पाण्याचे जलसंपदा विभागाने केलेले नियोजन लगेचच कोलमडले. पाण्यासाठी लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला आणि त्यातून पाण्याची अक्षरश: वाटमारीच झाल्याने पाण्याचे नियोजन विस्कळीत व्हायला उशीर लागला नाही. गतवर्षी उजनी धरणातील १२.७५ टीएमसी पाण्याचे नियोजन ठरले होते. यात जलाशय उपसा सिंचन-९.६० व भीमा-सीना जोडकालवा-३.१५ असे मिळून १२.७५ टीएमसी पाण्याचे  नियोजन ठरले असताना प्रत्यक्षात राजकीय ताकद वापरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला वेठीस धरून नियोजनबाहय़ पाणी सोडायला भाग पाडले. त्यामुळे जलाशय उपसा सिंचन-१५.५२, भीमा-सीना जोडकालवा-७.७१, भीमा नदी-१९.८९ व सीना नदी (शिरापूर ते कोर्सेगाव बंधारा)-२.४० याप्रमाणे प्रत्यक्षात एकूण ४५.०१ टीएमसी पाण्याचा वापर झाला. यात ३२.२६ टीएमसी पाण्याचा वापर नियोजनबाहय़ झाल्याचे दिसून येते. पाणीवापरासंदर्भात आठमाही धोरण ठरलेल्या उजनी धरणातील पाणीवापराच्या नियोजनात प्रवाही सिंचनासाठी उन्हाळी हंगामात तरतूद नाही. केवळ उजनी जलाशयाच्या वरील भागात २.९० टीएमसी पाणी वापराचे नियोजन ठरले आहे. मात्र तरीसुद्धा जलाशयाच्या वरील भागात करमाळा व नगर परिसरासाठी ९.६० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आणि प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल १५.५२ टीएमसी पाणी वापरले गेले. खरीप हंगामात नदीप्रवाहातून पाणी वापराची तरतूद असली तरी त्यातून पाणी बचतीच्या अनुषंगाने उपयोग होत नसल्याचे मानले जात आहे. उजनी धरणाच्या पाणी वापरात भीमा नदीत पाणी सोडण्याची तरतूद नाही. तरीदेखील पंढरपूरच्या आषाढी व कार्तिकी यात्रांसाठी तसेच सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी १९.८९ टीएमसी पाणी नियोजनबाहय़ सोडले गेले. त्यामुळे धरणाच्या कालव्यावरील आवर्तनात कपात करावी लागली. भीमा-सीना जोडकालव्याद्वारे शिरापूर कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंतच सीना नदीत ३.१५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद नसताना प्रत्यक्षात जोडकालव्यातून सीना नदीत सोडलेले पाणी कव्हे बंधारा ते कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत सोडले गेले. त्यासाठी १०.११ टीएमसी पाण्याचा जास्तीचा वापर झाला.  या पाश्र्वभूमीवर उजनी धरणातील शिल्लक असलेल्या जेमतेम पाणीसाठय़ाचा विचार करता पुढील वर्षभर पाण्याचे नियोजन करताना पाणी वापरात शिस्त लावण्याची गरज निर्माण झाल्याचे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. उजनी धरणातील पाण्याचे आठमाही धोरण असल्याने उसासाठी धरणाच्या वरील भागातच पाणी देणे बंधनकारक आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी राजकीय ताकदीचा वापर करून धरणाच्या खालील भागात कालवे, जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करतात आणि दबावतंत्राचा वापर करतात. त्यामुळे प्रशासनाची कोंडी होते. यात सोलापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे दोघे आपली जबाबदारी टाळत असल्याची चर्चा प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी दबल्या आवाजात करत आहेत.