गुप्तधनापोटी सातपुडय़ात मांडूळ सापांचे हत्यासत्र Print

सोमनाथ सावळे
बुलढाणा
उत्तर भारतातील व मुंबईच्या काही सापांच्या तस्कर टोळ्यांची नजर या जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या रांगांमध्ये आढळणाऱ्या दोन तोंडेसदृश मांडूळ सापावर पडली असून त्यामुळे सातपुडा व पूर्णा नदीकाठावरील बिनविषारी मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  
मांडूळ सापांच्या संदर्भात अनेक अंधश्रद्धा आहेत. मांडूळ साप हा प्रामुख्याने गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येतो. मुंबई व उत्तर भारतातील अनेक टोळ्या महाराष्ट्र व देशाच्या अनेक राज्यांत गुप्तधन शोधण्याचे काम करतात. या टोळ्यांचा मांडूळ साप गुप्तधन शोधून देतो, असा समज आहे. जिल्ह्य़ातील सातपुडा परिसरातील पूर्णाकाठ परिसरात मोठय़ा प्रमाणावर असे दोन तोंडसदृश मांडूळ साप आढळतात. तांत्रिक-मांत्रिकांकडून या सापाला प्रचंड मागणी आहे. हे साप लाखो रुपयांना विकले जातात. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या व तांत्रिक-मांत्रिक या सापांची खरेदी करतात. मुंबई आणि उत्तर भारतातील अशा टोळ्यांची नजर सातपुडय़ातील मांडूळ सापांकडे वळली आहे. मुंबईच्या अशा टोळ्या बेमालूमपणे सातपुडय़ातील पूर्णा नदीच्या काठांनी फिरतात. मांडूळ साप पकडणे हाच त्यांचा उद्देश असतो. नांदुरा पोलिसांनी या सापाची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला तवेरा गाडीसह नुकतेच जेरबंद केले होते.
सर्पतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मांडूळ सापाला उत्तर भारतीय व मुंबईचे लोक डबल इंजिन संबोधतात. त्याचे इंग्रजी प्रजातीय नाव अर्थबोया असे आहे, मात्र कोणतेही साप गुप्तधन शोधून देत नाहीत. अंधश्रद्धेच्या नावाखाली ही फसवणूक सुरू असून त्यामुळे मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे साप शेतकऱ्यांचे मित्र व शेतरक्षक असतात. सातपुडय़ातील मांडूळ सापांची वाढती तस्करी लक्षात घेता जळगाव जामोद, खामगाव व मोताळा वनपरिक्षेत्राधिकारी व खामगावच्या साहाय्यक वनसंरक्षकांना त्यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बुलढाणा वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक ए. आर. जावरे यांनी दिली. मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध भारतीय वनअधिनियम व वन्यजीव संरक्षण अशा दोन्ही कायद्यांन्वये कठोर कारवाई केली जाईल, असे उपवनसंरक्षक दिलीप गुजेला यांनी सांगितले. मांडूळ सापांची तस्करी ही वनखात्याची डोकेदुखी बनली आहे.