प्रमोद जोशुआ गल्फ डर्ट ट्रॅक राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता Print

प्रतिनिधी
नाशिक
बंगळुरूच्या प्रमोद जोशुआने येथील चौथ्या व पाचव्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवून गल्फ डर्ट ट्रॅक मोटारसायकल राष्ट्रीय स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळविले. बंगळुरूच्या स्पर्धकांची पूर्णपणे छाप पडलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हॅरीथ नोहा, तृतीय आर. नटराज यांनी मिळविला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत व्ही. एस. नरेश, औरंगाबादच्या दुसऱ्या फेरीत केपी अरविंद आणि जोधपूरच्या तिसऱ्या फेरीत प्रमोद जोशुआ व हॅरीथ नोहा यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविल्याने गल्फ डर्ट ट्रॅक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम विजेता नाशिक येथे रंगणाऱ्या चौथ्या व पाचव्या फेरीत ठरणार होता. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस् असोसिएशन ऑफ इंडिया (एफएमएससीआय)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई येथील स्पोर्टस्क्राफ्ट या संस्थेच्या वतीने नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टस् असोसिएशन (नासा) यांच्या सहकार्याने येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित या स्पर्धेस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिकच्या मानसिंग ठाकूर, शमीम खान, विनीत कुरूप, गणेश लोखंडे, हर्षल कडभाने यांनाही प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले. खास नाशिककरांसाठी ठेवण्यात आलेल्या १६५ सीसी गटात मानसिंग ठाकूरने प्रथम, गणेश लोखंडेने द्वितीय, तर अनिश नायरने तृतीय क्रमांक मिळविला.