‘मांडूळ’ विक्रीच्या आमिषाने फसविणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात Print

वार्ताहर
मालेगाव
मांडूळ विक्रीचे आमिष दाखवून लोकांना ठगविणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा येथील विशेष पोलीस पथकाने छडा लावला आहे. गिऱ्हाईक म्हणून गेलेल्या पोलिसांकडून पैसे घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील सदस्यांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मांडूळच्या साहाय्याने गुप्तधनाचा शोध लावता येतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्याचा गैरफायदा घेत शहरातील लोकांना मांडूळ विकण्याच्या बहाण्याने ठगविण्याच्या घटना काही दिवसात घडल्याची चर्चा आहे. निर्जन ठिकाणी आलेल्या गिऱ्हाईकाकडून पैसे घेऊन मांडूळ न देता त्यास मारहाण करून पोबारा करणे, अशी या टोळीची खासियत आहे. या पाश्र्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने व उपअधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीचा छडा लावण्यासाठी विशेष पथक निर्माण करण्यात आले. पथकातील सहाय्यक निरीक्षक पी. डी. देशपांडे व उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे हे दोघे येथील नव्या बसस्थानकाजवळील एका लॉजमध्ये शनिवारी सायंकाळी नकली गिऱ्हाईक म्हणून गेले. ठरल्याप्रमाणे मांडूळ विक्री करणारी व्यक्ती तेथे आली. उभय पक्षात मांडूळ खरेदी-विक्रीची प्राथमिक चर्चा झाल्यावर शहराजवळील वडगाव शिवारात थांबलेल्या अन्य व्यक्तींकडे मांडूळ असल्याची माहिती या व्यक्तीने दिली. त्यांनतर साध्या वेशातील पोलिसांनी या व्यक्तीसह वडगाव गाठले. सांगितल्याप्रमाणे तेथे वाहनासह अन्य आठ व्यक्ती होत्या. त्यांच्याकडे लाठय़ा-काठय़ा होत्या. मांडूळ विक्रीच्या बहाण्याने पैसे हिसकावून पोलिसांवर हल्ला करण्याचा या टोळीचा इरादा होता. मात्र तत्पूर्वीच त्यांना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पलायन केले. मात्र तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन दुचाकी व भ्रमणध्वनी असा ७३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिघांनी दिलेल्या माहितीवरून पलायन करणारे अन्य पाच जण हे धुळे जिल्ह्य़ातील अजनाळे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे निंबा अहिरे (रा. सोयगाव), मुकेश ह्य़ाळीज व गोकुळ ह्य़ाळीज (रा. डोंगराळे) अशी आहेत.