रायगड जिल्ह्य़ाच्या १८३ कोटींच्या प्रारूप आराखडय़ाला मंजुरी Print

प्रतिनिधी
अलिबाग  
 गेल्या वर्षभरापासून रखडलेली जिल्हा नियोजन समिती बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तब्बल साडेसात तास चालल्या या मॅरॅथॉन बैठकीत २०१३-२०१४ साठीच्या १८३ कोटीच्या प्रारूप आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्य़ाच्या रस्ते विकासाचा मास्टर प्लान तयार करण्याचे निर्णयही घेण्यात आला असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आणि रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विधान परिषदेच्या निवडणुका यामुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. शेकाप आणि शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यात ही बैठक झाली. या बैठकीत २०१३-२०१४ साठीच्या १८२ कोटी ७१ लाख रुपयांच्या प्रारूप आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. यात १२१ कोटींच्या सर्वसाधारण घटकांसाठी, ४६.९८ कोटी आदिवासी उपयोजनेसाठी तर १४ कोटी विशेष घटक योजनेचा समावेश असणार आहे.
या बैठकीत जिल्ह्य़ात वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांची संख्या आणि खराब रस्ते यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगीतले. मेरीटाइम बोर्ड, पर्यावरण आणि खारलॅण्ड विभागातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्या विभागातील मंत्र्यासोबत बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे ठरविण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगीतले.
जिल्ह्य़ातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्य़ात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी पर्यावरणमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे नियोजन समितीत ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
जिल्ह्य़ातील रस्ते विकासाचा मास्टर प्लान तयार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार जिल्ह्य़ातील सर्व राज्य मार्ग आणि प्रमुख मार्गाचे सर्वेक्षण करून रुंदीकरण अथवा चौपदरीकरणाचे प्लानिंग केले जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील प्रमुख रस्त्याचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरण सुरू आहे. त्या चौपदरीकरणासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
मुरुड येथे २५ खाटांचे महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. ते तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. २०१२-२०१३ च्या ४६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यासाठी येत्या २१ तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात यंदा भाताचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे येत्या १० नोव्हेंबरपासून जिल्ह्य़ातील १० तालुक्यांतील १७ भात खरेदी केंद्रांवर आधारभूत किमतीने भात खरेदी सुरू केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यात भाताला १२५० एवढा हमीभाव शासनाने देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.