‘सिंधुदुर्गातील गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य’ Print

घराची लॉटरी लागलेल्या सदस्यांना मार्गदर्शन
वार्ताहर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ज्यांना घरांची लॉटरी लागली त्या सर्वाना कायदेशीर मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवली असून घराची लॉटरी ज्यांना लागली आहे त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत गिरणी कामगारांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी तालुक्यातील गिरणी कामगारांची बैठक आम. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. तेव्हा दिनकर मसगे बोलत होते. या वेळी शामसुंदर कुंभार, राजेंद्र पडते, सुभाष परब, सदाशिव गाड आदी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व उपस्थित कामगारांच्या साक्षीने गिरणी कामगार संघ सिंधुदुर्गची स्थापना करण्यास सर्वानी अनुमती दिली. या संघटनेबाबत दिनकर मसगे, शामसुंदर कुंभार यांनी विवेचन केले. गिरणी कामगार संघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून सर्व गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली.
गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर व गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाने घरांची लॉटरी लागलेल्या सर्व कामगारांचे कायदेविषयक प्रश्न सोडविण्यात येतील. घरांची सोडत लागली अशा सर्व कामगारांनी आवश्यक ते पुरावे गोळा करून ठेवण्याचे आवाहन दिनकर मसगे यांनी केले.
घरांची मोफत लॉटरी लागलेल्या सर्वानी दक्षता घेऊनच घराचा ताबा घ्यावयाचा आहे. आवश्यक ती माहिती व कायदेविषयक सल्ला मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच मदत करू, कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही असे दिनकर मसगे यांनी बोलताना सांगितले.
या वेळी लवू राऊळ, मोहन देसाई, जयराम राऊळ, महादेव मयेकर, सुनिता परब, रवीना नाईक, सत्यवती मुळीक, आरती परब, रजनी धुरी, प्रकाश गवळी, रमेश रेगुळकर, कृष्णा देसाई, सुरेश वावरे, अभिमन्यू लोंढे व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.