सिन्नर रेल्वेमार्ग भूसंपादन; बुधवारी शेतकऱ्यांबरोबर अंतिम बैठक Print

प्रतिनिधी
नाशिक
सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्प आणि विशेष आर्थिक क्षेत्रासाठी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी नाशिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यांतील १० गावांतील भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सात नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शेतकऱ्यांची वाटाघाटीसाठी अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित सर्व शेतकरी भूधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीने या नोटिसा देण्यात आल्या असून जोगलटेंभी, देशवंडी (ता. सिन्नर) आणि पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी सकाळी १० ते ११.३० दरम्यान, बारागाव पिंप्री सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान, नायगाव, पाटपिंप्री (ता. सिन्नर) दुपारी १२.३० ते १.३०, गुळवंच दुपारी १.३० ते २.३० आणि एकलहरा, हिंगणवेढे व जाखोरी (ता. नाशिक) दुपारी ४ ते ५ दरम्यान नियोजन भवनात शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. ही वाटाघाटीने दर ठरविण्याविषयी अंतिम बैठक असून शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेली नोटीस घेऊन व्यक्तिगतरीत्या उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केले आहे. यापूर्वी शासनाने जिरायती शेतीसाठी १५ लाख, तर बागायती शेतीसाठी ३० लाख रुपये दर जाहीर केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१चे कलम ३३ (२)नुसार भूसंपादनासाठी वाटाघाटीने जमिनीचे दर निश्चित करण्याकामी यापूर्वी बैठका घेण्यात आल्या आहेत. मागील बैठकांमध्ये वाटाघाटीद्वारे दर निश्चित होऊ शकलेला नाही.