नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वाईतील जवान शहीद Print

वार्ताहर
वाई
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी रविवारी सुरक्षा चौक्यांवर केलेल्या सशस्त्र हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. यात उडतारे ता. वाई येथील राजेंद्र अर्जुन कुंभार यांचा समावेश आहे.
येथील बाचेली भागात राष्ट्रीय खनीज विकास महामंडळाच्या संकुलात रविवारी सकाळी ८ च्या सुमारास सशस्र नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात कुंभार आणि अन्य एक जवान शहीद झाले असून नक्षलवाद्यांनी त्यांच्या एक-४७ आणि इतर शस्त्रे पळवून नेल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सात आठ वर्षांपूर्वी भरती झालेले राजेंद्र कुंभार (३५) यांच्या मागे पत्नी, चार वर्षांची मुलगी, आई-वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
वाई तहसीलदारांना आपल्या भागातील जवान शहीद झाल्याचे कळविण्यात आले. त्यांचे पार्थिव उद्या सोमवारी उडतारे याच्या गावी आणण्यात येणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातील जवान शहीद झाल्याचे वृत्त पसरताच गावावर शोककळा पसरली.