पाळणेकोंड धरणाचा पाणीसाठा वाढविण्यासाठी तज्ज्ञांची पाहणी Print

वार्ताहर
सावंतवाडी
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाच्या येथे गोडबोले गेट बसवून पाणी साठवण दुप्पट करण्याच्या योजनेची प्रत्यक्ष पाहाणी नाशिकमधील तज्ज्ञांनी केली. त्यामुळे गोडबोले गेटच्या प्रस्तावास मान्यता मिळवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराला मुबलक पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. सावंतवाडी नगरपालिकेने पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेटच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देऊन पहिला टप्प्याचे एक कोटी २० लाख अनुदान प्राप्त आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने नगराध्यक्ष बबन साळगांवकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज तज्ज्ञ समितीला माहिती दिली. जीवन प्राधिकरणाने सीडीओ आर. व्ही. श्रीगिरीवार, कार्यकारी अभियंता राजेश मोरे, चन्नेवार यांनी पाळणेकोंड धरणाची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सभापती विलास जाधव व राजू बेग, अभियंता नानाजी पालव, भाऊ भिसे आदी उपस्थित होते. पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेटच्या कामाला नगर परिषदेने मान्यता देऊन आर्थिक तरतूद केली, पण तांत्रिक मंजुरीसाठी काम रखडले होते. आज प्रत्यक्षात तज्ज्ञ समितीने पाहणी केली. तत्पूर्वी या संदर्भातील सर्व माहिती त्यांनी घेतली.
या समितीने गोडबोले गेटला तांत्रिक मंजुरी दिल्यावर निविदा प्रक्रिया होईल. त्यानंतर कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले. ही समिती समाधानकारक निर्णय घेईल, अशी आशा साळगावकर यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेटचे  प्रत्यक्षात काम साकारल्यानंतर आजच्यापेक्षा तेवढेच दुप्पट पाणी साठवणूक होईल. सावंतवाडी शहर झपाटय़ाने वाढत असल्याने सर्वाना मुबलक पाणी मिळवून देण्याचे आमचे कर्तव्य आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले.