कोल्हापूरच्या खंडपीठासाठी वकील संघटनेचे आंदोलन Print

वार्ताहर, सावंतवाडी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी येत्या ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सहा जिल्ह्य़ांतील वकील संघटनांनी आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.

या कालावधीत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय वकील संघटनांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून ५, ६ व ७ नोव्हेंबरला आंदोलन करण्याचे वकील संघटनांनी ठरविले आहे. या तिन्ही दिवशी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्य़ांतील सर्व वकील कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहतील, असा वकील संघटनांनी ठराव घेतला आहे.
तसेच ५ व ६ नोव्हेंबरला प्रत्येक जिल्ह्य़ाचे व तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयाबाहेर लाक्षणिक उपोषणे करावीत, तसेच ७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन निवेदन देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने घेतला आहे. त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचा पाठिंबा आहे, असे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड्. दिलीप नार्वेकर यांनी म्हटले आहे.
यापुढे सर्व प्रकारची लोक न्यायालय, मेडिएशन कार्यक्रम, ए. डी. आर व इतर कोणताही कार्यक्रम न्यायालयामार्फत राबविण्यात आल्यास त्या कार्यक्रमापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील वकिलांनी अलिप्त राहावे, असा ठराव घेतला आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व वकील कोल्हापूर खंडपीठाखाली आग्रही आहेत, असे अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी म्हटले आहे.