बिरवाडीमध्ये पाणी समस्येवरून सरपंचाला घेराव Print

महाड, ५ नोव्हेंबर :
महाड तालुक्यातील काँग्रेसची सत्ता असलेल्या बिरवाडीमधील कुंभारवाडा मोहल्ला ग्रामस्थांनी पाणी समस्येवरून पंचायतीच्या कार्यालयामध्ये हल्लाबोल केला. गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई असताना पंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच लक्ष्मण पवार यांना घेराव घालून पंचायतीच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील ज्या काही महत्त्वाच्या पंचायती आहेत, त्यामध्ये बिरवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. औद्योगिकीकरणामुळे बिरवाडी पंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. ज्या प्रमाणात महसुली उत्पन्न वाढले, त्या स्वरूपांमध्ये नागरी सुविधा पूर्ण करण्यात पंचायतीला अपयश आले. गावातील कुंभारवाडा मोहल्ला या दाट लोकवस्तीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ३ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा पंचायतीने बंद केला होता. गेले दोन दिवस मोहल्ल्यातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असताना पंचायतीने दूषित पाणीपुरवठा कोणत्या कारणावरून होत आहे याची तपासणी केली नाही. पाण्याची पर्यायी व्यवस्थादेखील केली नाही. त्यामुळे दोन दिवस पाण्यासाठी महिलांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. कुंभारवाडा परिसरातून काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले आहेत. पंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता असून सरपंचपदावरदेखील काँग्रेसचे लक्ष्मण पवार आहेत, असे असताना सत्ताधारी सदस्यांनी पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दोन दिवसांपासून पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. सरंपच पवार यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये समधान न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. घेराव घालण्यात आला. जोपर्यंत पाण्याची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर सरपंच यांनी पाण्याचा टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
कुंभारवाडा मोहल्ल्यांतील इकबाल माटवणकर यांनी दूषित पाण्याचा पुरवठा होत असताना ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तसेच या भागातील पाण्याची समस्या सतत जाणवते ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी, अशी मागणी केली.पंचायतीचे सदस्य गफूर आरकर यांनी पंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून योग्य प्रकारे कामे केली जात नसल्याने पाण्याची समस्या सतत जाणवत असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली.
बिरवाडींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही समस्या आहेत, त्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी सातत्याने केली. स्वच्छता, आरोग्य, रस्ते इत्यादी महत्त्वाच्या नागरी सुविधा पूर्ण करण्यात पंचायतीचे प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. पंचायतीला महसुली उत्पन्न सर्वाधिक असताना ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून का वंचित राहावे लागत आहे, असा सवाल बिरवाडीतील नागरिक करीत आहेत. कुंभारवाडा मोहल्ल्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.