कोंढाणे येथील विनायक गोगटे यांना ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार घोषित Print

कर्जत, ५ नोव्हेंबर
कर्जत तालुक्यातील कोंदिवडेनजीकच्या कोंढाणे येथील प्रगतिशील शेतकरी  विनायक गोगटे तथा बापू गोगटे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
गत अनेक वर्षांपासून विनायक गोगटे यांनी भातशेतीच्या समवेत आपल्या शेतामध्ये आंबा, काजू, नारळ अशा अनेक फळझाडांचीही लागवड केलेली आहे. कंपोस्ट खत, गांडूळ खत, तसेच हिरवळीच्या खतांचा सुयोग्य प्रकारे उपयोग करून त्यांनी दर्जेदार स्वरूपाच्या कृषी उत्पादनवाढीचे एक उत्तम उदाहरण सर्व शेतकऱ्यांकरिता समोर ठेवले आहे.
त्याचप्रमाणे शेती व्यवसायाला पूरक, असा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन आणि दुग्धव्यवसाय हे अन्य व्यवसायदेखील विनायक गोगटे यांनी यशस्वीरीत्या चालविलेले आहेत. याआधी त्यांना उत्कृष्ट पशुपालनविषयक विशेष पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, तसेच कर्जत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अशा अन्य जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून बापू गोगटे हे सामाजिक कार्यामध्येदेखील अग्रेसर राहिले आहेत.
विनायक गोगटे यांच्या या सर्व कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना हा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार घोषित केला आहे. राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी राज्य शासनाच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. कर्जत तालुक्यातील सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांकडूनदेखील
विनायक गोगटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.